शरद पवारांना वयाच्या 82 व्या वर्षीही विश्रांती नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना भेटले आणि त्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हाच महाराष्ट्रात भविष्यातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असेल हा राजकीय संदेश दिला आहे!! त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकार पुढे खऱ्या अर्थाने आव्हान उभे असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रबळ विरोधी पक्षाचे!! आता शरद पवार या विरोधी पक्षाची मजबूत बांधणी करणार आहेत. Sharad Pawar’s remaining political ambition, to build big opposition party in maharashtra “NCP”
राष्ट्रवादी काँग्रेस जन्माला आल्यापासून जास्तीत जास्त काळ सत्तेवर राहिलेला पक्ष आहे. 2014 ते 2019 अशी 5 वर्षे विरोधी पक्षात आणि आता इथून पुढची उरलेली 2.5 वर्षे विरोधी पक्षात अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे.
पण आता महाराष्ट्रातला सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची उभारणी करताना शरद पवारांच्या राजकीय खेळीचा धोका मात्र भाजप आणि शिवसेनेतला एकनाथ शिंदे गट यांच्यापेक्षा सोनिया राहुल गांधी यांची काँग्रेस आणि शिवसेनेतला उद्धव ठाकरे गट यांनाच राहणार असल्याचे राजकीय वास्तव दिसत आहे.
– ममता बॅनर्जींच्या प्रयोगाची महाराष्ट्रात घंटा
शरद पवारांची ही खेळी म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगाल मधल्या राजकीय प्रयोगाची महाराष्ट्रात घंटा वाजवण्यासारखे ठरणार आहे. हे थोडेसे तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या नात्यासारखे राहणार आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजप विरुद्धच्या जबरदस्त संघर्षात सातत्याने स्वतःच्या तृणमूल काँग्रेसचे बळ वाढवण्यासाठी सोनिया, राहुल गांधी यांची काँग्रेस फोडली. त्या काँग्रेसची शक्ती कमकुवत केली आणि त्यांनी तृणमूळ काँग्रेसचे भरण पोषण केले. तसेच आता शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक भरण पोषणासाठी भविष्यात करावे लागणार आहे.
– राष्ट्रवादीचा स्थानिक संघर्ष एकनाथ शिंदेंशी
केंद्रातला सत्ताधारी आणि महाराष्ट्रातला नंबर एकचा पक्ष म्हणून भाजप फुटण्याची शक्यता नाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल्यानंतर शिवसेनेतला एकनाथ शिंदे गट फुटण्याची शक्यता नाही. त्यातही ज्यांना मंत्रिपदे मिळतील ती सगळी मंत्री पदे एकनाथ शिंदे गट आपल्या संघटनेचा विस्तार करण्यासाठी वापरेल आणि शिंदे गटाचा विस्तार याचा अर्थ ग्रासरूट लेव्हलवर राष्ट्रवादीशी तीव्र संघर्ष. त्यामुळे या तीव्र संघर्षात जर राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाशी मुकाबला करायचा असेल तर स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांच्याकडून रसद घेतल्याशिवाय म्हणजेच त्यांना फोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करताना शरद पवार आणि त्यांचे स्थानिक नेते स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि शिवसेनेतला उद्धव ठाकरे गटच फोडतील हे उघड आहे. यातून हे दोन्ही पक्ष कमकुवत होतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होत राहील, पण तीही मर्यादित स्वरूपात!! कारण पवारांचा हेतूच राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभा करण्याचा राहणार आहे.
– महत्त्वाकांक्षेची घसरण
याचा अर्थ शरद पवारांच्या वयाच्या 82 व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय महत्त्वाकांक्षा काय आहे??, तर महाराष्ट्रातला सर्वात प्रबळ विरोधी पक्ष बनण्याची!! यालाच राजकीय विरोधाभास म्हणतात. राजकीय दृष्ट्या ऐन भरात असताना शरद पवारांची महत्त्वाकांक्षा आणि झेप पंतप्रधान पदाची होती. ते पद नाहीच मिळाले तर निदान राष्ट्रपतीपदाची होती. पण आता तेही मिळत नाही हे पक्के लक्षात आल्यानंतर उर्वरित राजकीय जीवनात राजकीय महत्त्वाकांक्षा उरली आहे, ती महाराष्ट्रातला प्रबळ विरोधी पक्ष उभा करण्याची!! याची कारणे अनेक आहेत. पण त्यातले सगळ्यात महत्त्वाचे कारण वैयक्तिक महत्त्वाकांक्षा सफल करण्यात राजकीय कर्तृत्व कमी पडण्याचे आहे. हे पवार समर्थक पत्रकार मान्य करणार नाहीत. पण म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही आणि ती नाकारण्यातही मतलब नाही!!
शिवाय महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना पुन्हा बांधताना पवारांना फोडावी लागेल ती काँग्रेस आणि उरलेली शिवसेनाच!! महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतरचा हा राजकीय विरोधाभासाचा दुसरा अंक ठरणार आहे.
Sharad Pawar’s remaining political ambition, to build big opposition party in maharashtra “NCP”
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : महाराष्ट्रासाठी भाजपचा दूरवरचा विचार, म्हणून हा मास्टरस्ट्रोकच, वाचा खरी रणनीती
- शिंदे – फडणवीस सरकार : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रो आरे कारशेड ते जलयुक्त शिवार सर्व जुना योजनांचे पुनरुज्जीवन!!
- मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस एकटेच नाहीत; मग एवढी चर्चा का??; उपमुख्यमंत्री की कार्यकारी मुख्यमंत्री??
- प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षादेशाचे पालन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट!!