प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागपूरात सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने आमने – सामने येत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे हे नागपुरात पोहोचले त्यांनी मनसेच्या महामेळाव्याला संबोधित केले आणि त्यानंतर विधान भवन गाठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली या दोन्ही नेत्यांमध्ये नंतर बंद दाराआड चर्चा झाली. Raj Thackeray – Chief Minister Eknath Shinde’s goodwill visit at Vidhan Bhavan
विधिमंडळातील राजकीय घमासानात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अनुचित उद्गार काढल्यानंतर त्यांना विधानसभेने अधिवेशन काळापुरते निलंबित केले. म्हणून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन केले. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज, शुक्रवारी नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी थेट विधान भवनात येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली.
राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर असताना मनसेच्या पदनियुक्ती सोहळ्यात त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना नियुक्तीपत्रे दिली. यानंतर हा मनसेचा पक्षीय कार्यक्रम आटोपून राज ठाकरे नागपूरच्या विधान भवनात पोहोचले. राज ठाकरे विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दालनात राज ठाकरेंनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर हे देखील उपस्थित होते.
बंडखोरी केल्यानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पहिली भेट झाली होती. या भेटीत दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. यानंतर पुन्हा राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. तर दिवाळीनिमित्त राज ठाकरे यांच्या मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले होते. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही सहभागी झाले होते. त्यात आता नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Raj Thackeray – Chief Minister Eknath Shinde’s goodwill visit at Vidhan Bhavan
महत्वाच्या बातम्या