वृत्तसंस्था
पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परंतु नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी शहरातील निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार येईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. दरम्यान, मार्केटयार्डमधील ५० टक्के गाळे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. Pune restrictions to be tightened: Police Commissioner Amitabh Gupta’s warning; Decision to keep the marquees in the marketyard at 50%
एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक, मार्केटयार्ड परिसर या गर्दीच्या ठिकाणांना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी जमावबंदीत दिवसा रस्त्यावरील गर्दी कमी झाली नाही तर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात सायंकाळी ६ नंतर संचारबंदी लागू आहे. सायंकाळनंतर नागरिक घराबाहेर पडत नाही. मात्र, दिवसभर नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. असंख्य नागरिक लहान मुलांसह फिरत आहेत. त्यामुळे संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा लोकांविरुद्ध कारवाईच्या सूचना दिल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
सर्व पोलिसांच्या चाचण्या करणार
शहरात दररोज १२ ते १५ पोलिसांना कोरोना होत आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी सर्व पोलिसांच्या चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मार्केटयार्ड ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार
सोमवारी पोलीस अधिकारी, व्यापारी, वाहतूकदार, बाजार समिती यांच्या बैठक झाली. त्यात गुलटेकडी बाजारातील दररोज एका बाजूचे गाळे एकाआड एक दिवस सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. २१ एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील एकूण गाळ्यांपैकी दररोज फक्त ५० टक्के गाळे सुरु राहणार आहेत. तेथे किरकोळ विक्री होणार नाही. तसेच शनिवार व रविवारी बाजार बंद असेल. यामुळेही गर्दी कमी झाली नाही तर बाजार बंद ठेवण्यात येईल, असा इशारा दिला आहे.