वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. मृतांची संख्या वाढतच आहे. विद्युतदाहिन्या 24 तास सुरु असून महापालिकेने आता तर सर्व 21 स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली आहे. Power outage starts 24 hours in Pune
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात रोज 30 ते 40 बॉडी विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कारासाठी येत होत्या. परंतु, आता दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्व स्मशानभूमींचा वापर करणे क्रमप्राप्त ठरले आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कांडुल यांनी दिली.
विद्युत, गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. परंतु, आता लाकडाचा वापरही सुरु केला आहे. विद्युत दाहिन्या 24 तास कार्यरत आहेत. मृतदेहाला गुंडाळण्यासाठी प्लास्टिकचा वापर होतो.त्यामुळे विद्युतदाहिनीत बिघाड होत आहे. त्या वारंवार बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे ससून रुग्णालयात कोरोनाचे बळी पडलेले 40 ते 50 मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेत असून अंत्यसंस्कार हे वैकुंठ स्मशानभूमीतील 12 लाकडी दाहिन्यात केले जात आहेत. पण, धुराचा त्रास होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली. त्यामुळे पांढरा कोळसा वापरला जात आहे.
मृतदेह वाहतुकीसाठी पीएमकॅपीकडून 6 आसन विरहित बस घेतल्या आहेत. या बस ससून, भारती हॉस्पिटल, कोव्हिड जंबो सेंटर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथून मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी केल्या जात आहेत.