प्रतिनिधी
औरंगाबाद : राज्यात भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून, यासंबधीचे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नुकतेच केले होते. मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षाला महाविकास आघाडीत सामील करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीला आघाडी करण्यासाठी ऑफर दिली आहे. मराठा – मुस्लिम कॉम्बिनेशन घडविण्यासाठी पवारांनी वाटचाल सुरू केली आहे.Pawar-Owaisi handshake to stop BJP
राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडत असताना पवार हे एमआयएमला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याच्या बेतात आहेत.
राज्यात भाजपला रोखण्यासाठी तसेच मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षालाही महाविकास आघाडीत सामील करण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एमआयएमचा निरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवण्यात येणार आहे.
भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही : पवार
‘भाजपकडून होणा-या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही…’ असं शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांच्या बैठकीत गुरुवारी सांगितले होते. त्या दिशेने पवार पावले टाकताना दिसत आहेत.
गुरूवारी संध्याकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत पवारांची बैठक झाली. या बैठकीतही विधिमंडळात भाजपला आक्रमक प्रत्युत्तर देण्याचा निर्णय झाल्याचे समजते आहे. दुसरीकडे भाजपनेही शरद पवार यांना प्रतिआव्हान दिले आहे.