विशेष प्रतिनिधी
मुंबई : हत्तींच्या आहारात कलिंगड आणि शहाळी, माकडांसाठी खास फळांचा लॉलीपॉप, तर सर्व प्राण्यांना गारेगार अनुभव देणारा ‘आइस केक’. ही काही कविकल्पना नसून मुबंईतील प्रसिद्ध राणीच्या बागेत प्राण्यांसाठी खास दिल्या जाणाऱ्या मेजवानीचा बेत आहे.Mumbai Zoo provides fruits for animals
उन्हापासून बचाव करण्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) प्राण्यांना खास फळांचा मेवा दिला जात आहे. कलिंगड, पपई, केळी, चिकू, आंबा अशा फळांचे तुकडे करून त्यामध्ये गुळाचा पाक टाकला जातो.
त्यानंतर हे मिश्रण गोठवून त्याचा ‘आइस केक’ बनविण्यात येतो. पाणघोड्यांच्या आहारात भोपळ्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच माकडांसाठी आंबे, भूईमुगाच्या शेंगा टाकल्या जात आहेत.
किवी, ड्रॅगन फ्रुट, आंबा, कलिंगड यांच्या रसामध्ये मध टाकून त्यापासून ‘लॉलिपॉप’ बनवून माकडांना देण्यात येत आहेत. आंबा आणि भूईमुगाच्या शेंगा आंब्याच्या पेटीत दडवून माकडांच्या पिंजऱ्यात ठेवल्या जातात.उन्हाळ्यात प्राण्यांना उष्णतेमुळे त्वचेचे आजार, डीहायड्रेशचा त्रास होतो.
नैसर्गिक अधिवासात असलेल्या प्राण्यांना या समस्या सोडविणे शक्य असते, मात्र पिंजऱ्यातील प्राणी पक्षांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. याची दखल घेत केळी, चिकू, भोपळा, आंबा, कलिंगड तसेच शहाळ्याच्या पाण्यापर्यंत सर्वकाही प्राण्यांच्या दिमतीला ठेवले आहे.