वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईत नोकरीसाठी आलेल्या महिलांची राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबईतील ताडदेव येथे म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर एक हजार महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारले जाणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. Hostel for working women in Mumbai; Housing Minister Jitendra Awhad’s announcement
आव्हाड म्हणाले, मुंबईत राज्यभरातून महिला नोकरीसाठी येतात. मात्र त्यांना उपनगरांमध्ये राहावे लागते. त्यामुळे प्रवासामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे ‘म्हाडा’ अंतर्गत ताडदेव येथील एम.पी.मिल कम्पाउंड परिसरात महिलांसाठी हे सुसज्ज वसतिगृह उभारणार आहे.
सहा महिन्यात काम सुरु
मंत्रालय, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, ग्रँट रोड अशा ठिकाणांपासून हे वसतिगृह जवळ असेल. त्यामुळे महिलांचा वेळ व प्रवासाचा त्रास वाचणार आहे. 450 खोल्यांचे हे सुसज्ज वसतिगृह साधारणपणे दीड ते दोन वर्षात उभारले जाणार आहे. सहा महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल.
35 कोटी रुपये एवढा खर्च
या कामासाठी अंदाजे 35 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. वसतिगृह उभारल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम स्वतंत्र संस्था करेल. त्यामुळे गुणवत्ता व सोयीसुविधांवर परिणाम होणार नाही, असेही आव्हाड यांनी सागितले.