प्रतिनिधी
मुंबई – पंढरपूरातून तुम्ही समाधान आवताडेंना विधानसभेत निवडून द्या. हा मतदानाचा कार्यक्रम तुम्ही करा… मी महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारचा करेक्ट कार्यक्रम तुम्हाला करून दाखवतो, असा आत्मविश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूरातील विराट सभेत बोलून दाखविला. devendra fadanavis hints at change in govt in maharashtra
भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या समर्थनार्थ पंढरपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विराट सभा झाली. यावेळी फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अनेक गैरकारभार केलेत. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्यासाठी पंढरपूरच्या लोकांना पहिली संधी मिळाली आहे. पंढरपूरकरांनी भाजपच्या उमेदवाराला निवडून देऊन यांचा कार्यक्रम करावा, मी राज्यात या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो’, असे म्हणत राष्ट्रवादीला जोरदार टोला हाणला. त्यावेळी गर्दीतून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कोरोना काळात आम्ही राजकारण करत नाही. आम्ही मदत करायला निघालो आहोत. पण तुमचा जो उठतो तो सोम्यागोम्या केवळ राजकारण करतो. कोरोनाच्या नावाने हे योग्य नाही, असा टोला फडणवीसांनी संजय राऊतांना हाणला.
ते म्हणाले, की संजय राऊत काहीही बोलत असतात. त्यांना मी उत्तर देत नाही. केंद्राने सर्वात जास्त पीपीई कीट, सर्वात जास्त मास्क, सर्वात जास्त लसी राज्याला दिल्या. एकीकडे सरकारकडून पत्रके काढली जात आहे. महाराष्ट्र लसीकरणामध्ये अव्वल आहे. जर असे असेल तर मग या लसी कुठून पैदा झाल्या. या लसी केंद्र सरकारने दिल्या म्हणूनच आल्या ना, असा सवाल फडणवीसांनी केला.