सर्वाधिक सुमारे ७०० कोटी रूपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात
प्रतिनिधी
मुंबई : राज्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. यामध्ये ७०० कोटी रूपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागाचे झाले आहे. या नुकसानीबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली आहे. 1,800 crore road damage in the state due to heavy rains
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते, पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक सुमारे ७०० कोटी रूपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झाले असून, त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व नाशिक विभागाचा नंबर आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानीची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अद्यापही अनेक ठिकाणी पाऊस सुरू असून, दरडी साफ करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे, तर अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त रस्त्यांची छायाचित्रे व ड्रोन चित्रिकरणाच्या माध्यमातून प्राथमिक हानीचा अंदाज काढण्यात आला आहे.
– ३ ऑगस्ट रोजी मुंबईत बैठक
प्राथमिक अंदाजानुसार २९० रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते, ४६९ रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती, तर १४० पूल व मोऱ्या पाण्याखाली गेले होते. अंतिम पाहणी अहवालात नुकसानीच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाची मुंबईत बैठक होणार असून त्यावेळीही राज्यातील परिस्थितीचा पुनःश्च आढावा घेतला जाईल.
दरम्यान, राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या नुकसानाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.