• Download App
    uddav Thackrey ठाकरे ब्रँडची खेचाखेची, पण इतरांच्या हातात जाऊच का दिली सत्तेची गुरुकिल्ली??

    uddav Thackrey ठाकरे ब्रँडची खेचाखेची, पण इतरांच्या हातात जाऊच का दिली सत्तेची गुरुकिल्ली??

    नाशिक : ठाकरे ब्रँडची खेचाखेची, पण इतरांच्या हातात जाऊच का दिली सत्तेची गुरुकिल्ली??, असा सवाल विचारायची वेळ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या भाषणांनी आज आणली. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या दोघांनी केलेल्या भाषणांमध्ये एकमेकांना बोचकारे काढण्याखेरीज कुठले नवे मुद्दे तर नव्हतेच, पण आपल्या घरापलीकडे जाऊन नव्या नेतृत्वाच्या शोधायची कुठली गरजही त्यांना वाटली नसल्याचे समोर आले उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे ठाकरेंचे ब्रॅण्डिंग केले, तर एकनाथ शिंदे यांनी नेहमीचेच मुद्दे उगाळत आपला मुलगा श्रीकांत शिंदे यांचे ब्रँडिंग केले.

    त्यापलीकडे जाऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या आणि शिवसैनिकांच्या मनात जे असेल तेच मी करेन असे म्हणाले. अर्थातच असते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबरच्या युती संदर्भातले व्यक्तव्य होते. दोन ठाकरे एकत्र येऊ नयेत. मराठी माणसाची एकजूट होऊ नये म्हणून मालकांचे नोकर आणि नोकरांचे नोकर एकमेकांना भेटतायेत. मुंबई आपल्या ताब्यातून गेली तर करायचे काय याची भीती त्यांना वाटते पण आपण मुंबई आपल्या ताब्यात घ्यायची महाराष्ट्राच्या आणि शिवसैनिकांच्या मनात असेल, तेच करायचे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

    पण मूळात सवाल हा येतो की, उद्धव ठाकरेंना हे म्हणावेच का लागले?? हे म्हणण्याची वेळ येण्याइतपत उद्धव ठाकरेंनी परिस्थिती घसरूच का दिली?? राज ठाकरे, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्यासारखे मोहरे शिवसेनेतून बाहेर पडताना उद्धव ठाकरेंनी त्यांना अडवले का नाही?? त्यांच्या मनात असलेल्या कामाचे आणि पदाचे वाटप त्यांना का केले नाही?? उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये या सगळ्या नेत्यांविषयी एवढी भीती किंवा एवढा आकस का निर्माण झाला?? हे सगळे नेते शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतःहून का कारणीभूत ठरले?? या सवालांची उत्तरे उद्धव ठाकरे स्वतःहून कधी शोधणार आहेत की नाहीत?? हे सगळे नेते फक्त सत्ता हवी होती म्हणून भाजपच्या वळचणीला निघून गेले, असा आरोप जरी सत्य मानला, तरी मूळात भाजप सारख्या शिवसेनेपेक्षा दुय्यम स्थानावर असलेल्या पक्षाच्या हातात सत्तेची गुरुकिल्ली गेलीच कशी या सगळ्यात महत्त्वाच्या सवालाचा उद्धव ठाकरे विचार करून प्रामाणिक उत्तर देणार आहेत की नाही?? हे सगळे सवाल उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या मुळे समोर आले.



     उद्धव कार्यशैली बदलणार का

    या सवालांची उत्तरे उद्धव ठाकरेंना रुचणारी नसली तरी स्वतः उद्धव ठाकरे यांची कार्यशैली आणि स्वभाव हेच शिवसेनेत फूट पडण्यासाठी आणि मोठमोठे नेते शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी कारणीभूत ठरले, हे नाकारून कसे चालेल?? शिवसेनेच्या सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्यासारख्या विश्वासघातकी नेत्याशी संधान बांधले. त्यावेळी आपली शिवसेना नावाची संघटना खिळखिळी करण्यासाठी पवारच कारणीभूत ठरले होते हे उद्धव ठाकरेंनी लक्षात का घेतले नाही??

    आज उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मनात असलेला आणि शिवसैनिकांच्या मनात असलेला निर्णय घ्यायला तयार असल्याचे सांगितले. पण इतके वर्ष राज ठाकरे यांच्याबरोबर हातमिळवणी करून ठाकरे ब्रँडची किंमत पुरेपूर वसूल करायला त्यांना कुणी अडवले होते?? केवळ भाजपला शिव्या देऊन किंवा एकनाथ शिंदेंचे वाभाडे काढून ठाकरे ब्रँडची किंमत पुरेपूर वसूल होणार नाही. दोन ठाकरे एकत्र येऊ नयेत म्हणून बाकीच्या शक्ती प्रयत्न करणारच आहेत पण त्या शक्तींवर मात करून दोन ठाकरेंनी एकत्र येऊन दाखविणे ही खरी कसोटी आहे आणि ती कसोटी दोन ठाकरेंनाच पार करावी लागणार आहे. ती इतरांनी पार करावी अशी अपेक्षा ठेवणे गैर आहे.

    – फक्त मुलाच्या ब्रँडिंगने शिंदे सेना तरणार नाही

    त्याचबरोबर स्वतःची स्वतंत्र शिवसेना चालवताना एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे सारखे वागून चालणार नाही हे सुरुवातीलाच लक्षात घ्यावे लागेल. शिवसेनेच्या वर्धापनदिनी स्वतःच्या मुलाचे ब्रॅण्डिंग करणे हे शिवसेनेच्या दीर्घकालीन वाटचालीसाठी फारसे चांगले लक्षण नव्हे, हे त्यांना लक्षात घ्यावे लागेल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रभाव कमी झाल्याशिवाय आपला प्रभाव वाढणार नाही हे भाजपच्या नेतृत्वाने सुरुवातीपासून डोक्यात ठेवून वाटचाल केल्याने भाजप वाढला. तो भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मर्यादेपलीकडे वाढू देईल, अशी अपेक्षा ठेवणेही तितकेच चूक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या मुलाचे मर्यादित ब्रँडिंग करून पक्षातल्या इतर नेतृत्वांनाही विकसित केले, तरच त्यांची शिवसेना टिकणार आहे. अन्यथा ठाकरेंच्या ब्रँड वर उद्धव आणि आदित्य ठाकरे तरून जातील, पण एकनाथ शिंदेंना कुठला ब्रँड वाचवायला येणार नाही, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित करून लक्षात ठेवला पाहिजे.

    Why uddav Thackrey let go other leaders from Shivsena?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    फ्रंटिअर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून महाराष्ट्र बनणार ‘रिइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग’चा नवा चेहरा!!

    खासगीकरण आणि कंत्राटी पद्धतीमुळे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपले; प्रकाश आंबेडकराचा दावा

    विद्यार्थ्यांना दिलासा; बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी आदी संस्थांच्या फेलोशिपच्या जाहिराती येत्या 10 दिवसांत!!