वृत्तसंस्था
पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे शहरासह जिल्ह्यासाठी राज्यापेक्षा स्वतंत्र नियमावली बनविली आहे. त्या अंतर्गत आवश्यक वस्तूंची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत उघडी असतील आणि शनिवार आणि रविवार असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लागू असेल. पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी बुधवारी हा आदेश दिला. Weekend lockdown in Pune from this evening, administration, police ready; Only milk and medicine will be available
पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेले आदेश राज्य सरकारशी सल्लामसलत करून घेतले आहेत. पुण्यातील १ लाखांच्या जवळपासच्या अनेक सक्रिय प्रकरणांचा विचार हा निर्णय घेण्यामागे केला आहे.
आज शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून दोन दिवसांचा लॉकडाऊन लागू होणार आहे. तो सोमवारी सकाळपर्यंत लागू राहणार आहे. या दोन दिवसात केवळ दूध मिळणार असून मेडिकलची दुकाने वगळता इतर दुकाने बंद असतील. हा विकेंड लॉकडाऊन मागील आठवड्याप्रमाणेच कडक असेल. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले.
दरम्यान, सोमवार ते शुक्रवार या काळात संचारबंदी लागू असून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना दिवसा समज दिली जात असून रात्री कोणाचीही गय केली जाणार नाही. दंड केला जाईल, असे ते म्हणाले.