महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने भाजप – अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना मेजर बूस्टर डोस दिला असला तरी काँग्रेससाठी देखील ग्रामीण मतदारांनी एक विशेष संदेश दिला आहे, तो संदेश म्हणजे काँग्रेसला इथून पुढे पवार – ठाकरेंचे ओझे बाळगायचे काहीच कारण नाही. तो झुगारण्याचाच जनादेश ग्रामीण भागातील जनमताच्या कौलाने दिला आहे.Village verdict in maharashtra for Congress to topple pawar and thackeray and bring Congress as main opposition party
काँग्रेसला 293 ग्रामपंचायतीत सत्ता मिळाली आहे. त्या उलट शरद पवारांचे स्थान पाचव्या क्रमांकावर जाऊन त्यांच्या राष्ट्रवादीला फक्त 205 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवता आली आहे तर उद्धव ठाकरेंचा स्कोअर फक्त 140 आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीत काँग्रेसच पवार – ठाकरेंना खूपच पिछाडीवर टाकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे.
याच अर्थ महायुतीच्या बुलडोझरने पवार – ठाकरेंचे गड उद्ध्वस्त केले आहेत. पण काँग्रेससाठी मात्र बिलकुलच तेवढी निराशाजनक बातमी नाही. उलट काँग्रेसच्या पराभवाच्या ढगाला एक चंदेरी किनार लाभली आहे, ती म्हणजे ग्रामीण भागात काँग्रेसचा अजूनही पाया विशिष्ट ठिकाणी टिकून आहे. काही ठिकाणी भक्कम आहे. काँग्रेसच्या अत्यंत वाईट संघटनात्मक काळात देखील काँग्रेसचा मतदार काँग्रेसशी प्रतारणा करत नाही. काँग्रेसने संघटनेकडे लक्ष दिले, तर काँग्रेसचा मतदार आणि काँग्रेसच्या किनाऱ्यावर उभा असलेल्या मतदार आजही काँग्रेसकडे वळू शकतो हा संदेश या ग्रामपंचायत निवडणुकांनी दिला आहे.
पवारांचे गारुड उद्ध्वस्त
या ग्रामपंचायती निवडणुकांनी महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे “पॉलिटिकल मिथ्” उद्ध्वस्त करून टाकले, ते म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवारांची जबरदस्त पकड आहे. पवारांच्या या तथाकथित पकडीचा पंजा ग्रामीण महाराष्ट्राने उखडून फेकून दिला आहे. पवारांना ग्रामीण महाराष्ट्राची नाडी समजते हा मराठी प्रसारमाध्यमांनी पसरवलेला समज देखील ग्रामीण मतदारांनी गैर ठरविला आहे. आणि नेमका यातच काँग्रेससाठी ग्रामीण मतदारांचा विशिष्ट संदेश दडला आहे.
काँग्रेसने आता शरद पवारांच्या कथित प्रभावाचे किंवा उद्धव ठाकरेंच्या राजकीय मस्तीचे ओझे आपल्या अंगावर बाळगण्याचे काहीच कारण नाही. उलट ते झुगारून द्यावे आणि आपल्या संघटनात्मक बळाकडे लक्ष द्यायला सुरुवात करावी. ते बळ वाढवावे आणि पवार – ठाकरेंचा महाराष्ट्रातला उरला सुरला प्रभाव देखील संपुष्टात आणून महाराष्ट्रात महायुती पुढे बळकट विरोधी पक्ष म्हणून उभे राहावे, हा जनादेशच ग्रामीण मतदारांनी काँग्रेसला दिला आहे.
– पवारांच्या मागे काँग्रेसची फरफट
गेल्या दोन दशकांमध्ये आत्तापर्यंत काँग्रेसची शरद पवारांमागे फरपट होत होती. वास्तविक शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भरण पोषण काँग्रेसच्याच आर्थिक आणि कार्यकर्त्यांच्या बळाचे शोषण करून केले होते. आज शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच मतदारांनी पाचव्या क्रमांकावर नेऊन ठेवली आहे. शरद पवारांच्या नावावर ग्रामीण भागात मते मिळतात पवार फिरले की मते फिरतात वगैरे “पॉलिटिकल मिथ्” मतदारांनी संपुष्टात आणले आहे. आता पवार फिरोत किंवा न फिरोत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मते मिळणार नाहीत. त्यांचा राजकीय वारसा अजित पवारांकडे आला आहे हेच ग्रामीण मतदारांनी सिद्ध केले आहे.
बड्या विरोधी पक्षाची काँग्रेससाठी “पॉलिटिकल स्पेस” उपलब्ध
त्यामुळे काँग्रेसने पवार – ठाकरे यांचे ओझे आपल्या खांद्यावरून कायमचे उतरवले, तर काँग्रेसला संपूर्ण महाराष्ट्रातल्या एका बड्या विरोधी पक्षाची संपूर्ण “पॉलिटिकल स्पेस” उपलब्ध होऊ शकते आणि त्यासाठी आगामी सहा – आठ महिन्यांचा मोठा काळ काँग्रेससाठी उपलब्ध आहे. काँग्रेसच्या 5 – 10 बड्या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र वाटून घेऊन फिरून पिंजून जरी काढला तरी ठाकरे – पवारांचा उरलासुरला राजकीय प्रभाव नष्ट करून त्यांचा मतदार काँग्रेसच्या पाठीशी उभा करून स्वतः बळकट पक्ष म्हणून उभा करणे हे काँग्रेसला सहज शक्य आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधींच्या 1980 सालच्या कमबॅकचा राजकीय इतिहास जरी वाचला तरी त्यातून त्यांना बरेच धागेदोरे मिळून काँग्रेसच्या पुनरुज्जीवन आणि बळकटीसाठी ते उपयोगी ठरतील आणि पवार – ठाकरेंचे ओझे कायमचे उतरवायला काँग्रेस नेते उद्युक्त होतील. कारण ग्रामीण मतदार आजही पवार – ठाकरेंपेक्षा काँग्रेसलाच मोठा पक्ष मानतो, हेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे. आता काँग्रेसने या जनमताचा आदर करून दाखवला पाहिजे.
Village verdict in maharashtra for Congress to topple pawar and thackeray and bring Congress as main opposition party
महत्वाच्या बातम्या
- ‘पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपाचं! – ग्रामपंचायत निवडणुक निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ग्रामपंचायत निकालाची फायनल आकडेवारी; भाजप नंबर 1 ही नेहमीची बातमी; पवार – ठाकरेंचे गारुड उतरले ही खरी बातमी!!
- महाराष्ट्रात आता ठाकरे – पवारांमध्ये राजकी चुरस; पण ती पहिल्या – दुसऱ्या क्रमांकासाठी नव्हे तर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी!!
- शुबमन गिल-सारा तेंडुलकरच्या डेटिंगवर सारा अली खानने केलं शिक्कामोर्तब!