महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 70 वर्षांमध्ये जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही, तेवढी बदनामी महायुती सरकारच्या 150 दिवसांच्या कारकिर्दीत झाली असा “जावईशोध” शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लावला. या जावईशोधामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्सुनामीच्या लाटा उसळल्या. जो तो आपली बदनामी व्हायला नको म्हणून बिळात जाऊन लपायला लागला. महाराष्ट्राची बदनामी काय व्हायची ती होवो, आपली बदनामी व्हायला नको, त्या बदनामीत सुप्रिया सुळे यांनी आपले नाव घ्यायला नको म्हणून जो तो देवाला साकडे घालू लागला!!
आता महाराष्ट्राच्या इतिहासात 70 वर्षांमध्ये जेवढी बदनामी झाली नाही, तेवढी बदनामी 150 दिवसांमध्ये झाली, हा “शोध” दस्तुरखुद्द सुप्रिया सुळे यांनी लावल्यामुळे त्याच्या सत्यतेविषयी कुणी शंका बाळगायचे कारणच नाही. कारण सुप्रिया सुळे आपल्या राजकीय आयुष्यात नेहमी खरेच बोलत आल्या, त्या कधी खोटे बोलल्याच नाहीत, अर्थातच असा दावा खुद्द त्यांनीच केलाय, त्यामुळे त्या दाव्याविषयी देखील कुणी शंका बाळगायचे कारण नाही.
महाराष्ट्राच्या फडणवीस मंत्रिमंडळातले मंत्री कोणी मोबाईलवर पत्ते खेळताहेत, कुणी बॅगेमध्ये रोकड लपून फिरताहेत, महाराष्ट्रातल्या कंत्रातदारांचे बळी चाललेत, शेतकऱ्यांचे बळी चाललेत त्यामुळे संसदेच्या लॉबीमध्ये इतर राज्यांचे खासदार आम्हाला विचारतायेत महाराष्ट्रात काय चाललेय??, असा बोचरा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. दर 50 दिवसांनी एका मंत्राची विकेट जाते, हे आम्हाला काही चांगले वाटत नाही. त्यामुळे आम्हाला आनंदही होत नाही, पण राज्याचे नुकसान होते, अशी मखलाशी सुप्रिया सुळे यांनी केली.
अर्थातच सुप्रिया सुळे यांनी “जावईशोध” लावला, त्यांनी दावा केला, बोचरा सवाल केला आणि मखलाशी केली, त्यामुळे इतरांनी त्यावर शंका – कुशंका काढायचे कारणच नाही. अर्थातच गेल्या 150 दिवसांमध्ये महाराष्ट्राची देश पातळीवर प्रचंड बदनामी झाली, हे “सत्य” सुप्रिया सुळे यांनी सांगितल्यामुळे मान्यच करावे लागेल.
– धनंजय मुंडे ते भोरचा आमदार
आधी धनंजय मुंडे यांचे प्रकरण झाले, ते विपश्यना करून आले त्यानंतर त्यांना हायकोर्टाने क्लीनचीट दिली त्यामुळे त्यांचा मंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला या सगळ्या प्रकारमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली. माणिकराव कोकाटे ऑनलाईन जुगार खेळले, भोरचे आमदार शंकर मांडेकरांच्या भावाने कला केंद्रात गोळीबार केला. तिथल्या कलावंतीला जखमी केले म्हणून महाराष्ट्राची बदनामी झाली. अर्थात दोन “पवार संस्कारित” मंत्र्यांमुळे आणि एक आमदारामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली, या किरकोळ सत्याकडे कुणी लक्ष द्यायचे कारण नाही, कारण हे सत्य सुप्रिया सुळे यांनी सांगितले नाही. म्हणून ते सत्य असू शकत नाही.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतली प्रकरणे बाहेर आली. गृह राज्यमंत्र्यांच्या डान्सबार मध्ये बायका नाचविल्या गेल्या. शिंदे पिता पुत्रांची कंत्राटे बाहेर आली. संजय शिरसाट यांच्या बॅगेतून नोटांचे पुडकी डोकावली म्हणून महाराष्ट्राची बदनामी झाली.
– “तेव्हा” महाराष्ट्राचे बिलकुल बदनामी नाही
– पण शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला, ते मुख्यमंत्री झाले, त्यावेळी महाराष्ट्राची बिलकुल बदनामी झाली नव्हती.
– पवार मुख्यमंत्री असताना मुंबईमध्ये 12 बॉम्बस्फोट झाले. पण तेरावा बॉम्बस्फोट मस्जिद बंदरला झाला, असे पवारांनी सांगितले. ते छातीठोकपणे खोटे बोलले. नंतर त्याचे समर्थनही केले, तेव्हा महाराष्ट्राची बिलकुल बदनामी झाली नव्हती.
– शरद पवारांच्या ड्रीम प्रोजेक्ट लवासा मधली घरे जमिनीत धसली, लवासा प्रोजेक्ट मधली कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक वाया गेली, पर्यावरण मंत्रालयाने पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट मोडून काढला. त्यातला भ्रष्टाचार झाकण्यासाठी पवारांना ठिकठिकाणी पेरणी करावी लागली मोदी सरकार कृपेने कसाबसा भ्रष्टाचार झाकला गेला, त्यावेळी महाराष्ट्राचे बिलकुल बदनामी झाली नाही.
– 2019 मध्ये पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या कौलाच्या पाठीत खंजीर खुपसला. महाराष्ट्राच्या जनतेने भाजप महायुतीला दिलेले बहुमत पवार आणि ठाकरे यांनी चोरले. पवारांनीच उद्धव ठाकरेंना घोड्यावर बसविले, त्यावेळी देखील महाराष्ट्राची बिलकुल बदनामी झाली नाही.
पण फडणवीस मंत्रिमंडळातल्या “पवार संस्कारित” मंत्र्यांनी काही “उद्योग” केले, त्याबरोबर महाराष्ट्राची गेल्या 70 वर्षात झाली नाही, एवढी बदनामी झाली. बरं झालं हा “जावईशोध” सुप्रिया सुळे यांनीच लावला. त्यामुळे फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या सरकारी गॅझेट मध्ये या शोधाची नोंद केली पाहिजे. म्हणजेच या “जावईशोधा”वर वज्रलेप केला पाहिजे!!