• Download App
    Narhari Zirwal स्टिंग' एनर्जी ड्रिंकवर विधानसभेत मोठी चर्चा:शाळांपासून 500 मीटर परिसरात विक्रीवर बंदीचे आदेश, तुकाराम मुंढेंची विधानभवनात एंट्री

    Narhari Zirwal : ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर विधानसभेत मोठी चर्चा:शाळांपासून 500 मीटर परिसरात विक्रीवर बंदीचे आदेश, तुकाराम मुंढेंची विधानभवनात एंट्री

    Narhari Zirwal

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Narhari Zirwal  राज्यातील शाळकरी मुलांमध्ये लोकप्रिय होत असलेल्या ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर अखेर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. पावसाळी अधिवेशनात या विषयावर जोरदार चर्चा झाल्यानंतर शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले. या चर्चेदरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे विधानभवनात उपस्थित असल्याने या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले.Narhari Zirwal

    भाजप आमदारांचा गंभीर मुद्दा; ‘दारूपेक्षाही स्टिंग घातक’

    श्रीगोंदा-नगरचे भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या दुष्परिणामांकडे सरकारचे लक्ष वेधले. पाचपुते म्हणाले की, स्टिंगमुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. नियमांनुसार विक्री होत असली तरी लहान मुलांना त्याची सवय लागत आहे. विशेष म्हणजे, या पेयाच्या बाटलीवरच लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी हे पेय योग्य नसल्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे अशा पेयांची विक्री शाळकरी मुलांना होऊ नये. त्यांनी तर “दारूपेक्षाही स्टिंग एनर्जी ड्रिंक अधिक घातक आहे,” असा दावा सभागृहात केला.Narhari Zirwal



    500 मीटर परिसरात विक्रीवर बंदी

    या चर्चेला उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी शाळांच्या परिसरात स्टिंगची विक्री होत असल्याचे मान्य केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शाळांच्या 500 मीटर परिसरात ज्या प्रकारे अंमली पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आहेत, त्याच धर्तीवर स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवरही बंदी घालण्यात येईल. त्यासाठी आवश्यक आदेश तातडीने जारी करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.

    विधानभवनात तुकाराम मुंढेंची उपस्थिती

    स्टिंग एनर्जी ड्रिंकवरील चर्चेदरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे विधानभवनात उपस्थित होते. गेल्या काही आठवड्यांपासून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर त्यांनी सुरू केलेल्या धडक कारवायांमुळे ते चर्चेत आहेत. मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, निकृष्ट अन्नपदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवर सातत्याने कारवाई केली जात आहे.

    फ्लेव्हर्ड पान, एनर्जी ड्रिंक आणि भेसळीचीही चौकशी

    भाजप आमदार राहुल कुल यांनीही सभागृहात आणखी गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्यांनी शाळांच्या परिसरात एनर्जी ड्रिंक्स, फ्लेवर पानाच्या नावाखाली अंमली पदार्थांची विक्री, तसेच फ्लेवर मिल्कच्या नावाखाली जास्त साखर आणि कृत्रिम पदार्थांचा वापर होत असल्याचा आरोप केला. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले की, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व बाबींची तपासणी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल.

    मुंबईतील नामांकित हॉटेल्सवर धडक कारवाई

    दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने नुकतीच मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लब आणि बेकरींवर मोठी कारवाई केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. त्यामध्ये नरिमन पॉइंट येथील ‘फ्लिंट अँड वार्सा’ या नामांकित रेस्टॉरंटचाही समावेश आहे. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार आढळून आल्याने परवाना निलंबित करण्यात आला.

    याशिवाय बोरीवलीतील एम. के. बेकरीमध्ये नूतनीकरण सुरू असतानाही अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याने कारवाई करण्यात आली. तसेच भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्रे येथील काही आस्थापनांवरही एफडीएने धडक कारवाई केली आहे.

    भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर मुंढेंकडे जबाबदारी

    अन्न व औषध प्रशासन विभाग गेल्या काही महिन्यांत भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपांमुळे चर्चेत होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची या विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. 25 मे रोजी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्न सुरक्षा, गुटखा, पानमसाला, निकृष्ट अन्नपदार्थ आणि नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात धडक कारवाया सुरू केल्या आहेत. आता विधानसभेतील चर्चेनंतर शाळांच्या परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर निर्बंध आणण्याचा निर्णय झाल्याने राज्यातील शाळकरी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. तसेच एनर्जी ड्रिंक, फ्लेवर पान आणि इतर खाद्यपदार्थांबाबतही अन्न व औषध प्रशासनाची तपासणी अधिक कडक होण्याचे संकेत मिळत आहेत.

    Sting Energy Drink Banned Within 500 Meters of  Narhari Zirwal Maharashtra Schools

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण; सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, नार्कोटेस्टबाबत कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

    Bandu Jadhav on Uddhav Thackeray: ‘उद्धवसाहेब, तुम्ही नाही तर आदित्य ठाकरेंना तरी महाराष्ट्रभर फिरवा असं सांगितलं होतं’; बंडू जाधवांचा मोठा दावा

    Maharashtra Assembly : स्मार्ट मीटरवरून विधानसभेत जोरदार गदारोळ; सरकार म्हणाले ‘बंधनकारक’, नाना पटोलेंचा हल्लाबोल, नितेश राणेंचाही इशारा