विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nana Patole मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे अनेक उमेदवार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. त्यातच पटोले यांनी हा दावा केल्यामुळे महायुतीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.Nana Patole
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी मतदान झाले. त्यानंतर आता शनिवारी मतमोजणी होऊन राज्यात कुणाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधारी शिवसेनेचे अनेक उमेदवार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
शिंदेंचे अनेक उमेदवार काँग्रेसच्या संपर्कात
भाजप धोका देण्यात पटाईत पक्ष आहे. त्यांनी अनेक मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवारांना मतदान करण्यास नकार दिला होता. त्यामुळे शिंदे गटाचे लोक भाजपवर नाराज आहेत. हे उमेदवार भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास उत्सुक नाहीत. ते आमच्या संपर्कात असून, आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पटोले पुढे म्हणाले, आज मध्यरात्रीनंतर शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी होण्याची गरज आहे. महायुतीत मोठ्या गडबडी सुरू आहेत. ते कोणतेही पाप करू शकतात. त्यामुळे संपूर्ण रात्र व सकाळपर्यंत आम्ही चौफेर नजर ठेवणार आहोत. काही ठिकाणी आमच्यात अतितटीची लढाई आहे. तिथे काही अधिकारी गडबड करण्याची भीती आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
उद्या रात्रीपर्यंत सत्ता स्थापन करण्याचा दावा सादर करणार
महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल. ही स्थिती टाळण्यासाठी 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी सर्वच आमदारांना तत्काळ मुंबईत आणले जाणार आहे. वेळ कमी असल्याने यासंबंधी योग्य ती तजवीज केली जाईल. उद्या दुपारपर्यंत निकाल आल्यानंतर तातडीने सर्व आमदारांना मुंबईत बोलावून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील. त्यानंतर शनिवारी रात्रीच राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा सादर केला जाईल, असे पटोले यांनी यावेळी सांगितले.