विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शरद पवारांना त्यांच्या कुठल्या सुरल्या राष्ट्रवादीतली अस्वस्थता आणि गटबाजी सावरता येईना, पण त्यांनी राज्यात शांतता टिकवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पुन्हा एकदा फोन करून चर्चा केली. स्वतः पवारांनीच ही माहिती महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ साहित्यिकांना राजधानीत दिली.
विधानसभा निवडणुकीत प्रचंड दणका बसल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीतले आमदार आणि खासदार अजित पवारांच्या आणि भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायला उतावळे झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्या समर्थक तरुणांनी आवाज उठवून शरद पवारांसमोरच गटबाजीचे प्रदर्शन केले. यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झालेल्या बैठकीत पक्षातली अस्वस्थता पवारांसमोरच बाहेर आली. त्यावर पवारांना तिथे काही ठोस तोडगा काढता आला नाही. राष्ट्रवादीतील अस्वस्थता आणि गटबाजी पवारांना सावरता आली नाही.
पण पवारांना महाराष्ट्रातल्या अशांततेविषयी फार चिंता वाटली म्हणून त्यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. त्यानंतर फोनवरूनही चर्चा केली, पण पवारांची चिंता पत्र लिहून आणि फोन करून मिटली नाही म्हणून त्यांनी काल पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून 15 मिनिटे सविस्तर चर्चा केली. ही माहिती पवारांनी राजधानीत मराठी साहित्य संमेलनानिमित्त जमलेल्या साहित्यिकांना स्वतः दिली.
या साहित्यिकांमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम आदींचा समावेश होता. हे सगळे जण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. पवार याच संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत. त्यामुळे या साहित्यिकांसमोर बोलताना पवारांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती स्वतःहून दिली. महाराष्ट्रात शांतता टिकवण्याची जबाबदारी एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही तर सर्वांची आहे, असा निर्वाळा पवारांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना दिला.
पवार नेहमीच आपल्याला फोन करत असतात. त्यात काही नवल विशेष असे काही नाही, असे सांगून दोनच दिवसांपूर्वी फडणवीस यांनी पवारांच्या फोनचा विषय झटकला होता. त्यानंतर पवारांनी काल पुन्हा फोन करून फडणवीसांशी चर्चा केली. त्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या.