विशेष प्रतिनिधी
जळगाव : लोकसभा निवडणूक किंवा पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस बरोबर जातील किंवा त्यातील काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करतील, असे मोठे विधान शरद पवार यांनी केले. त्यांच्या विधानाने राज्यात चांगलीच खळबळ उडाली. त्यावर आता भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया देत ठाकरे गट व शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये कधी विलीन होणार याची तारीखच सांगून दिलीत. तर शरद पवारांच्या पक्षाचे व ठाकरे गटाचे अस्तित्व संपण्यास जमा असल्याचा त्यांनी दावा केला आहे.Sharad Pawar group and Thackeray group will merge with Congress when? Date mentioned by Fadnavis in Jalgaon
पवारांना अस्तित्व टिकवायचं तर…
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारांना आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं लागेल. त्यांना आपला पराभव दिसू लागलाय. त्यामुळे येत्या 4 जूनपर्यंत शरद पवारांचा गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन झालेला पाहायला मिळेल, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर 4 जूनपर्यंत ठाकरे गट आणि शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होतील आणि त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे, असं शरद पवार यांनी सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
पराभव जवळ दिसू लागल्याने..
पराभव जवळ दिसू लागल्याने शरद पवारांनी असे वक्तव्य केले आहे, ते अगदी सत्य देखील आहे. लोकसभेनंतर शरद पवारांची पार्टी आणि ठाकरेंची पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन. या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस बरोबर विलीन होणार आहे, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ही निवडणूक गल्लीची नव्हे दिल्लीची
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, स्मिता वाघ येणाऱ्या 4 तारखेला भारताच्या संसदेमध्ये खासदार म्हणून निवडून जाणार आहेत. एवढ्या तापमानामध्ये आपण सभेला उपस्थित आहात. मोठ्या मताधिक्याने आपण ताईला निवडून आणणार असा संकल्प आपण केला आहे. ही निवडणूक गल्लीची नव्हे तर दिल्लीची आहे. हे प्रामुख्याने सांगण्यासाठी मी उभा आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरेंची जळगावात सभा झाली. पण त्यांच्या भाषणात केवळ टोमण्यांचा मुद्दा होता, काही विकासाचा मुद्दा त्यांनी मांडले नाही.