विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अनेक केंद्रीय नेते त्याचबरोबर 22 राज्यांचे मुख्यमंत्री येणार आहेत. पण या दरम्यान स्वतः शरद पवार मात्र संसद अधिवेशनात व्यग्र राहणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या सोहळ्याचे निमंत्रण प्रोटोकॉल नुसार माजी मुख्यमंत्री म्हणून शरद पवार, उद्धव ठाकरे यांना शासनाने दिले. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शरद पवारांना फोन केल्याची बातमी मराठी माध्यमांनी चालविली. परंतु, संसदेचे अधिवेशन असल्यामुळे शपथविधी सोहळ्याला येता येणार नाही, असे पवारांनी फडणवीसांना कळविल्याचे त्या बातम्यांमध्ये नमूद केले आहे.
संसदेच्या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभा अशी सभागृह चालू राहण्याची वेळ सर्वसाधारणपणे सकाळी 11.00 ते सायंकाळी 6.00 अशी असते. फडणवीस यांचा शपथविधीचा सोहळा मुंबईत आज सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.
याच संसद अधिवेशनाच्या व्यग्रतेतून वेळ काढून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्री हे मुंबईत येऊन शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पण शरद पवार मात्र त्याचवेळी दिल्लीत संसद अधिवेशनात व्यग्र राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना पत्रकारांनी शपथविधी सोहळ्या संदर्भात प्रश्न विचारला होता, त्यावेळी त्यांनी त्याच दरम्यान दिल्लीत संसदेचे अधिवेशन आहे, असे उत्तर दिले होते.