नाशिक : उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या नादी लागले, अडीच वर्षांत घरी गेले; मग एकनाथ शिंदे काय करतील आणि त्यांचे काय होईल??, असा सवाल शिंदेंच्या सत्कारानंतर समोर आला.
शरद पवारांनी महादजी शिंदे पुरस्कार देऊन एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. त्यांना शिंदेशाही पगडी घातली. पवारांनी हा बाण सोडला भाजपच्या दिशेने, पण त्यात घायाळ झाली ठाकरे सेना. त्यामुळे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यावर आगपाखड केली. त्यामुळे शिंदेंचे नेते आनंदीत झाले. भाजपच्या नेत्यांनी मजा घेतली.
पण त्या पलीकडे जाऊन स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार हुरळून गेले. राज्याचे मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के शरद पवारांच्या भेटीला ६ जनपथ वर पोहोचले. तिथे त्यांनी पवारांची काही राजकीय चर्चा केली. याविषयी उदय सामंत यांनी पत्रकारांना माहिती दिली, पण ही माहिती देताना त्यांनी “राजकीय पुड्या” देखील सोडल्या. पवारांनी शिंदेंचा सत्कार केला, त्याबद्दल ठाकरे सेनेला पोटशूळ उठला याचा आनंद सामंत यांच्या चेहऱ्यावर दिसला.
पवार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि सामंत मराठी भाषा मंत्री आहे म्हणून ते साहित्य संमेलनाच्या आयोजनाबद्दल चर्चा करण्यासाठी पवारांना भेटले. पण पवारांनी त्या भेटीत सामंत यांना राजकीय प्रश्नच विचारले. या सगळ्या चर्चेची माहिती सामंत यांनी हुरळून पत्रकारांना दिली. कारण ठाकरे सेना डिवचली गेली होती.
उदय सामंत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले आणि नंतर फडणवीस मंत्रिमंडळातले मंत्री असले तरी ते पवारांच्या राष्ट्रवादीत देखील मंत्री होते. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी सोडली आणि ते शिवसेनेत दाखल झाले. नंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची साथ धरली. ते उदय सामंत पवार भेटी मध्ये हुरळून गेल्यास नवल नाही.
पण या सगळ्यात एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री आणि चेले एक गोष्ट विसरले, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या नादी लागले आणि अडीच वर्षांत घरी गेले. मग शिंदे हे फडणवीस मंत्रिमंडळात राजी असोत, अथवा नाराज असोत, ते पवारांसारख्या “अँटी मिडास टचच्या” नादी लागले, तर शिंदे किती दिवस टिकतील आणि ते केव्हा घरी जातील??, हा पुढील काळात संशोधनाचा आणि चर्चेचा विषय राहील.