विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rohit Pawar राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी नुकताच राजकीय निवृत्तीचा सूर लावल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. शिरसाट यांच्या या वक्तव्याचा आमदार रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी थेट सिडको जमीन घोटाळ्याचा संदर्भ देत शिरसाट यांना जबरदस्त टोला लगावला. सिडकोत मलिदा खाताना कुठेतरी थांबावे असा विचार का आला नाही? आता मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले. आता वय पुढे करून पळ काढू नका, असे रोहित पवार म्हणालेत.Rohit Pawar
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी “मी 10 वर्ष नगरसेवक होतो. आता चार टर्मचा आमदार आहे. झाले तेवढे पुरे, आता थांबले पाहिजे” असे वक्तव्य करून आपल्या समर्थकांना ऐन दिवाळीतच धक्का दिला आहे. संजय शिरसाट यांनी या वक्तव्यामुळे राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले की, कुटुंबातील नव्या पिढीला पुढे आणण्यासाठीची ही भूमिका आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता यावरून रोहित पवारांनी ट्विट करून संजय शिरसाटांवर निशाणा साधला आहे.Rohit Pawar
नेमके काय म्हणाले रोहित पवार?
“संजय शिरसाट, सिडकोत मलिदा खाताना कुठंतरी थांबावं असा विचार का आला नाही? आता मंत्रीपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले. भूमिपुत्रांचा हक्क डावलून सिडकोची हजारो कोटी रुपयांची जमीन बिवलकर कुटुंबाच्या आणि खासगी बिल्डरांच्या घशात घालणारी आपल्यासारखी व्यक्ती जेवढे दिवस राजकारणात राहील तेवढे दिवस लोकांचे नुकसानच होणार आहे. पण आता वय पुढे करून पळ काढू नका. सरकारची 5-6 हजार कोटी रुपयांची जमीन खासगी लोकांच्या घशात घातल्याचा इंच इंच हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल. आता सुट्टी नाही.” असा इशारा रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिला.
राहिला प्रश्न माझ्याबाबत तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचा, तर वेळ आणि ठिकाण तुम्ही सांगा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी समोरासमोर देतो माझ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्या, असे आव्हान आमदार रोहित पवार यांनी शिरसाट यांना दिले.
आणखी एका मंत्र्याची विकेट?
शिरसाट यांच्या निवृत्तीच्या वक्तव्यामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले असून, आता विरोधक अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. सिडको जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर शिरसाट काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, विरोधकांना सरकारमधील आणखी एका मंत्र्याची ‘विकेट’ पाडण्याचे श्रेय मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नेमके काय म्हणाले होते संजय शिरसाट?
“मी दहा वर्षे नगरसेवक आणि वीस वर्षे आमदार म्हणून काम केले आहे. जे स्वप्नातही पाहिले नव्हते, ते सर्व अनुभवले आहे. मात्र, वाढते वय माणसाला काही गोष्टी थांबवण्यास भाग पाडते. रोजची धावपळ आणि दगदग करण्यापेक्षा कधीतरी थांबायचे का? असा प्रश्न मनात आला आहे. आता थांबले पाहिजे, असा विचार मी मनाशी करत आहे, असे संजय शिरसाट म्हणाले होते.
यासाठी कुणाचा राजकीय दबाव, कोणी बोलत आहे किंवा वैतागून मी काही बोलत आहे अशातला काहीच भाग नाही. मी आता 64 वर्षांचा आहे. लवकरच मी 65 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. स्वप्न पाहायला आपण काहीही पाहू शकतो. मला 2029 पर्यंतचा काळ आहे. 2029 साली मी 69 वर्षांचा होईल. त्यावेळेस काय करावे याचा विचार तर केलाच पाहिजे ना, असे म्हणत त्यांनी राजकारणातील निवृत्तीचे संकेत दिले होते.
Rohit Pawar Taunts Minister Sanjay Shirsat Over CIDCO Scam Retirement Remark Don’t Run Away Citing Age
महत्वाच्या बातम्या
- Indian Army : भारतीय सैन्याचा 30 ऑक्टोबरपासून पाक सीमेवर सराव; पाकिस्तानने दोन दिवसांपूर्वी आपले हवाई क्षेत्र बंद केले, उड्डाणांवर बंदी
- US May Attack : व्हेनेझुएलावर हल्ला करू शकते अमेरिका, ड्रग्ज अड्डे-तस्करी मार्गांवर हल्ला करू इच्छितात ट्रम्प; नौदल ताफा तैनात
- Jyoti Malhotra : हिसारची यूट्यूबर ज्योती तुरुंगातून बाहेर येणार नाही; जामीन अर्ज फेटाळला, कोर्टाने म्हटले- तपासावर परिणाम होऊ शकतो
- बॉलीवूडची खानावळ नाही राहिली “उपयोगी”; म्हणून पाकिस्तानने वाढविली “दहशतवाद्यांची” यादी!!