• Download App
    Rohit Pawar and Sharad Pawar's NCP is on the way of Congress

    विलीनीकरणाचा विषय हवेत विरला; महाराष्ट्रातला उंट काँग्रेसच्या तंबूत शिरला!!

    Rohit Pawar

    नाशिक : विलीनीकरणाचा विषय हवेत विरला; महाराष्ट्रातला उंट काँग्रेसच्या तंबूत शिरला, असंच म्हणायची वेळ गेल्या काही दिवसांमधल्या महाराष्ट्रातल्या आणि दिल्लीतल्या राजकीय घडामोडींमुळे आली.Rohit Pawar and Sharad Pawar’s NCP is on the way of Congress

    – वेगळी राजकीय मसलत करावी लागली

    अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विषय शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी भरपूर लावून धरला, पण सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे अशा नेत्यांनी तो विषय हाणून पाडला. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यासाठी या सगळ्या नेत्यांना “बळ” दिले. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या कब्जात जाण्यापासून वाचली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष घातले नसते, तर अन्यथा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांच्या गोटाने पुरती वासलात लावली असती. पण तशी वासलात लावता आली नाही, म्हणून तर शरद पवारांच्या गोटातल्या नेत्यांना वेगळी राजकीय मसलत करावी लागली. याचीच परिणीती विलीनीकरणाचा विषय हवेत विरला आणि लबाड लांडगा काँग्रेसच्या कळपात शिरला, अशी घडली.



    – दिल्लीतली चिकाटी

    रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचा विषय अशा पद्धतीने लावून धरला, की त्याला घातपात सिद्ध केल्याशिवाय ते स्वस्थच बसणार नाहीत, असे त्यांच्या राजकीय हालचालींवरून दिसले. सुरुवातीला त्यांना सुप्रिया सुळे यांची साथ घ्यावी लागली, पण नंतर त्यांनी दिल्लीत चिकाटीने राहुन बड्या नेत्यांच्या अपॉइंटमेंट्स मिळविल्या आणि टप्प्याटप्प्याने त्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, खासदार संजय सिंग, द्रमूक नेत्या‌ कनिमोळी आणि अन्य प्रादेशिक नेत्यांचा समावेश होता.

    – खरे रहस्य काँग्रेस हायकमांडच्या भेटीत

    पण रोहित पवारांच्या दिल्ली भेटीचे खरे “राजकीय रहस्य” पुढच्या भेटींमध्ये दडल्याचे दिसून आले. रोहित पवारांनी
    काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि अखेरीस राहुल गांधी यांची भेट घेतली. अर्थातच या सगळ्या भेटींसाठी अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशी आणि तपासाचे निमित्त होते, प्रत्यक्षात स्वतःचे राजकीय बस्तान बसवायचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी काँग्रेसची दारे किलकिली करून ठेवायची, हा प्रमुख उद्देश होता. पण उघडपणे तसे बोलता येत नव्हते, म्हणून मग अजित पवारांच्या अपघाताची चौकशी आणि तपासाचे निमित्ताचा या भेटीगाठींसाठी वापर करण्यात आला.

    – विमान अपघाताचा विषय भावनिक

    एरवी रोहित पवारांसारख्या ज्युनिअर नेत्याला काँग्रेसच्या अध्यक्षांनी किंवा काँग्रेसच्या हायकमांडने भेटायचे काहीच कारण नव्हते. ज्या काँग्रेस हायकमांडने शरद पवारांसारख्या नेत्याला “मर्यादित” करून ठेवले होते, तिथे रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यासारखे नेते काँग्रेस हायकमांडच्या खिजगणतीतही नसले, तर त्यात आश्चर्य काही नव्हते, पण अजित पवारांच्या विमान अपघाताचा विषयच गंभीर आणि भावनिक असल्याने काँग्रेसच्या हायकमांडने रोहित पवार यांच्यासारख्या ज्युनियर नेत्याला भेटीसाठी येऊ दिले.

    – काँग्रेसच्या गोटात पाठविले

    पण यातून रोहित पवारांनी जे राजकारण साधायचे ते साधून घ्यायचाच “डाव” खेळला. कारण दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होतच नसेल, तर आपल्याला भाजपच्या सत्तेचा तुकडा मिळण्याची शक्यता नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्वतंत्र अस्तित्वाला आता काही राजकीय अर्थ उरलेला नाही. स्वतःचे राजकीय भवितव्य शोधायचे असेल, तर एकतर भाजपच्या वळचणीला जावे लागेल आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या वळचणीला घेतलेच नाही, तर काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसावे लागेल, हाच विचार करून शरद पवारांनी रोहित पवारांसारख्या ज्युनिअर नेत्याला काँग्रेसच्या गोटात पाठवून दिले. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या निमित्ताने रोहित पवारांनी दिल्लीत मुक्काम ठोकून राजकीय मुशाफिरी करून घेतली. सगळ्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन स्वतःला त्या नेत्यांच्या नजरेसमोर आणले. रोहित पवारांनी यातून स्वतःच्या आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांची थोडीफार का होईना, पण राजकीय बेगमी करायचाच “डाव” खेळला, खुद्द राहुल गांधींनी रोहित पवार यांच्या भेटीची आपल्या सोशल मीडिया हँडल वरून दखल घेतली, त्यामुळे रोहित पवार “धन्य” झाले. त्या पलीकडे रोहित पवारांच्या दिल्ली भेटीला फारसा अर्थ नव्हता.

    Rohit Pawar and Sharad Pawar’s NCP is on the way of Congress

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रभावी अस्त्रांचा निकामी वापर; “राहुल बुद्धीच्या” मागे विरोधकांची फरफट!!

    Retail Inflation : फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई वाढून 3.21% झाली; खाद्यपदार्थ महाग होण्याचा परिणाम

    Maharashtra LPG : राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही; गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष