विशेष प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्रात महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रभरातून हजारो नागरिकांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर हजेरी लावली. यावेळी महायुती सरकारने महाराष्ट्रातल्या तसेच देशातल्या हजारो साधुसंतांना विशेष निमंत्रण या शपथविधीसाठी दिले होते.
नाशिकमध्ये देखील महायुती सरकारच्या वतीने तसेच भाजपच्या वतीने साधुसंत, महंत तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींना विशेष निमंत्रण दिले होते. या शपथविधी समारंभाला नाशिक मधून अनेक साधू महंत मुंबईत आझाद मैदानावर उपस्थित होते. त्याचबरोबर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या सदस्यांना देखील शपथविधी समारंभाचे विशेष निमंत्रण होते. समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष पंडित शांताराम भानोसे, कोषाध्यक्ष शैलेश देवी, सचिव मुकुंद खोचे हे शपथविधी समारंभाला आवर्जून उपस्थित होते.
– रामतीर्थ विकासाची मागणी
रामकाळ पथ प्रकल्पात रामतीर्थासह विविध तीर्थ विकासाचा समावेश असावा, अशी मागणी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या सदस्यांनी केली. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशभरात विविध राज्यात पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने विविध प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये प्रामुख्याने नाशिकमध्ये रामकाळ पथ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी 99.14 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, याबद्दल समितीच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला.
त्याचबरोबर या प्रकल्पामध्ये रामतीर्थ तसेच रामतीर्थापासून ते टाळकुटेश्वर मंदिरापर्यंत गोदावरी मध्ये जी विविध तीर्थे आहेत, त्यांची स्वच्छता आणि विकासाचा समावेश असावा, अशी मागणीही समितीच्या सदस्यांनी केली. संबंधित प्रकल्पात कुठलेही कुंड न म्हणता रामतीर्थ म्हणावे, अशी अपेक्षा समितीचे उपाध्यक्ष पंडित शांताराम भानोसे यांनी व्यक्त केली. गोदावरी मध्ये रामतीर्थाबरोबरच सीतातीर्थ, ब्रह्मतीर्थ अशी अनेक तीर्थे आहेत. त्या सगळ्या तीर्थांना पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे, ते तसेच जपून या सर्व तीर्थांची स्वच्छता आणि विकास व्हावा, अशी अपेक्षा समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली. यासाठी नाशिक मधून निवडून आलेले महायुतीचे चार आमदार त्याचबरोबर नवनियुक्त सरकारकडे आम्ही तसा आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
असा असेल प्रकल्प
रामकाळ पथ प्रकल्प सध्या संकल्पना या स्थितीत आहे. त्यात प्रामुख्याने प्रभू श्रीरामांच्या काळातील नाशिकचे दर्शन घडवण्याच्या दृष्टिकोनातून विकास केला जाणार आहे. ज्यात तपोवनापासून रामकुंडापर्यंत प्रभू श्रीरामांशी निगडित विविध ठिकाणांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास केला जाणार आहे. याकरिता आराखडा बनविण्यासाठी पर्यटन विभागाचे अधिकारी लवकरच नाशिकमध्ये येणार आहे.