”तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे”, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील व्यापाऱ्यांना दोन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे या मुद्य्यासाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आनंद व्यक्त होत आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. Raj Thackerays reaction to the Supreme Court verdict on Marathi Patya
राज ठाकरे म्हणतात, ”सस्नेह जय महाराष्ट्र पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. ‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली.”
याचबरोबर ”मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे. असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे.” असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
याशिवाय ”महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. ‘मराठी पाट्या’ ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत. आपला नम्र राज ठाकरे” अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे.