विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात सुरूवातीला “बिनविरोध” निवडणुकीची चर्चा झाली. पण जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसे इच्छुकांची भाऊगर्दी वाढताना दिसत आहे. भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली. पक्षश्रेष्ठींकडून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. पण निवडणुकीच्या मैदानात विरोधकांची संख्या वाढत असून भाजपपुढे आव्हान उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे. यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. वंचितकडून अहिल्यानगर कार्यकारिणीच्या बैठकीत अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
काँग्रेससुद्धा निवडणूक लढण्यास इच्छूक
राहुरीच्या या रणांगणात आता पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे वंचितने आपला उमेदवार जाहीर केला असताना, दुसरीकडे काँग्रेसनेही राहुरी आणि बारामतीमध्ये निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेसकडूनही स्वतंत्र उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने ही लढत बहुरंगी आणि चुरशीची ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रयत्न “बिनविरोध”साठी,पण चर्चा “विरोधकांची”!
अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत 50 इच्छुकांनी तब्बल 103 अर्ज नेले. तर गोविंद मोकाटे यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल करत श्रीगणेशा केला आहे. 6 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून, 9 एप्रिलच्या माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. केवळ कर्डिले आणि तनपुरेच नव्हे, तर काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, शिंदे यांच्या शिवसेनेकडून राजुभाऊ शेटे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेबठाकरे) गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनीही उमेदवारीअर्ज नेल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची भूमिका गुलदस्त्यात आहे. याशिवाय मनसे, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, बसपा, आरपीआय (आठवलेगट) आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही दंड थोपटले आहेत.
वरवर पाहता ही निवडणूक सोपी वाटत असली तरी, मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीच्या काही गटांना शांत ठेवणे भाजपसाठी कठीण जात आहे. निवडणूक “बिनविरोध” करण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न केले होते, मात्र इच्छुकांची वाढती संख्या पाहता आता या नेत्यांना थांबवून निवडणूक एकतर्फी करणे हे भाजपसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. 9 एप्रिलपर्यंत किती जणांचे मन वळवण्यात भाजपला यश येते, यावर निवडणुकीची गणिते अवलंबून असतील.
Rahuri Bypoll: Vanchit Bahujan Aghadi Fields Anil Jadhav; Unopposed Bid Fails
महत्वाच्या बातम्या
- NCMC स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासाचा डिजिटल लाभ!!
- Iranian Oil : भारताकडे येणारे इराणी तेल टँकर चीनकडे वळले; गुजरातजवळ मार्ग बदलला, पेमेंट वादाची शक्यता
- JD Vance : डोनाल्ड ट्रम्प यांनी जेडी वेंस यांना नवीन जबाबदारी दिली; फसवणूक प्रकरणांचे प्रभारी बनवले
- विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यायचा शरद पवारांचा शब्द; पण तरी ठाकरे विधान परिषदेत पोहोचणार का??