• Download App
    Rahul Gandhi प्रभावी अस्त्रांचा निकामी वापर; "राहुल बुद्धीच्या" मागे विरोधकांची फरफट!!

    प्रभावी अस्त्रांचा निकामी वापर; “राहुल बुद्धीच्या” मागे विरोधकांची फरफट!!

    प्रभावी अस्त्रांचा निकामी वापर; “राहुल बुद्धीच्या” मागे विरोधकांची फरफट!!, हेच राजकीय चित्र राजधानी नवी दिल्लीतल्या संसद अधिवेशनादरम्यान दिसले.

    देशभरातल्या सगळ्या विरोधकांनी राहुल गांधींच्या नादी लागून अशा दोन प्रभावी अस्त्रांचा निकामी वापर केला, की ज्यामुळे त्या प्रभावी अस्त्रांविषयी शंका निर्माण व्हावी आणि त्यांच्या वापराचा उपयोग तर काही होऊ नये. Rahul Gandhi

    वास्तविक अविश्वास ठराव आणि महाभियोग ही राज्यघटनात्मक दृष्ट्या अत्यंत प्रभावी अस्त्रे. त्यांचा वापर जर राजकीय चतुराईने आणि राजकीय प्रगल्भतेने केला, तर सरकारे किंवा महाबलाढ्य अन्याय शक्तींना नेस्तनाबूत करण्याची शक्ती या दोन्ही घटनात्मक अस्त्रांमध्ये आहे, पण हीच अस्त्रे जर बिनडोकपणे वापरली, तर काय होऊ शकते, याचे उत्तर नुकतेच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावा दरम्यान मिळाले.

    ओम बिर्लांविरुद्ध अविश्वास ठराव

    वास्तविक ओम बिर्ला हे काही फार पक्षपाती वागत होते असे नाही. किंबहुना बलराम जाखड, शिवराज पाटील, मनोहर जोशी यांच्यासारख्या लोकसभेच्या सभापतींनी जी वर्तणूक ठेवली होती, तशीच वर्तणूक थोड्याफार प्रमाणात ओम बिर्लांची राहिली. बलराम जाखड लोकसभेचे सभापती असताना राजीव गांधींकडे राक्षसी बहुमत होते. त्यामुळे बलराम जाखड हे सरकारला अनुकूल निर्णय द्यायचे आणि विरोधकांना कोंडीत पकडायचे, पण त्यावेळचे विरोधक जरा हुशार असल्याने हातात असलेल्या मर्यादित शक्तींचा वापर सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी केला होता. शिवराज पाटील आणि मनोहर जोशी हे दोन मराठी लोकसभा अध्यक्ष देखील त्या गोष्टींना फारसा अपवाद नव्हते. त्यांनी पठडीबद्ध पद्धतीने लोकसभा चालविली. नरसिंह राव आणि वाजपेयी अशा दोन्ही सरकारांना अडचणी निर्माण होणार नाही एवढी “राजकीय व्यवस्था” केली. पण त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणायचा बिनडोकपणा त्यावेळच्या विरोधकांनी कधी केला नाही. सरकारांकडे पूर्ण बहुमत आहे. आपले असले अविश्वासाचे ठराव मंजूर होणार नाही, हे विरोधकांना माहिती होते. त्यामुळे विरोधक त्यावेळी expose देखील झाले नाहीत. विरोधकांची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली.

    ओम बिर्लांना दिली अकारण संधी

    पण या वेळच्या विरोधकांची “राहुल बुद्धी” इतकी बिनडोकपणाची ठरली, की त्यांनी ओम बिर्ला यांच्यासारख्या पठाडीबाज लोकसभा अध्यक्षाविरुद्ध अविश्वास ठराव आणून ओम बिर्लांना “जसेच्या तसे” पुन्हा वागायची नवी संधी निर्माण करून दिली. लोकसभा चालविताना ओम बिर्लांनी फार मोठी “क्रांती” केली असे अजिबात नाही. मोदींच्या राजवटीत ते शक्य देखील नाही. कारण मोदींची राजवट संघ विचारांच्या चौकटीत बद्ध आहे. तिथे नव्या विचारांना वाव नाही. त्यामुळे ओम बिर्ला हे विरोधकांना फार मोठी संधी देण्याची शक्यताच नव्हती. उलट ते नियमांच्या पुस्तकांवर वारंवार बोटे ठेवून विरोधकांची कोंडीच केली, पण ही कोंडी चतुराईने सोडवणे हे विरोधकांच्या बुद्धीचे काम आहे, ते बुद्धीने केले पाहिजे. पण ते न करता विरोधकांनी अविश्वास ठराव आणून तो बहुमताअभावी पाडून घेतला. ओम बिर्ला यांना “नैतिकतेच्या उंचीवर” जाऊन बसण्याची आयती संधी प्राप्त करून दिली, जे करण्याची बिलकुल गरज नव्हती. पण राहुल बुद्धीच्या मागे विरोधकांची फरफट झाली आणि विरोधक लोकसभेत तोंडावर पडले.



    ज्ञानेश कुमारांच्या विरोधात महाभियोग

    आता त्याचा पुढचा टप्पा म्हणून विरोधकांची राहुल बुद्धी मागे आणखी फरफट सुरू राहणार आहे. कारण विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरुद्ध महाभियोग चालवायचा निर्णय घेतलाय. त्या महाभियोगासाठी 193 खासदारांनी सह्या केल्यात. त्यामुळे तो महाभियोग येणार हे निश्चित, पण तो पराभूत होणार, हे त्याहून निश्चित!! कारण विरोधकांकडे तो महाभियोग मंजूर होण्यासाठी पुरेसे बहुमत नाही.

    राहुल गांधींची प्रेझेंटेशन्स फोल

    राहुल गांधींनी ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध आत्तापर्यंत 5 ते 7 प्रेझेंटेशन्स केली. त्यांनी ज्ञानेश कुमार यांना वैयक्तिक पातळीवर जाऊन टार्गेट केले, पण त्यामुळे निवडणूक आयोगाची किंवा ज्ञानेश कुमार यांची वैयक्तिक विश्वासार्हता फारशी घसरली, असे चित्र बिलकुल निर्माण होऊ शकले नाही. यात ज्ञानेश कुमार किंवा निवडणूक आयोग यांची विश्वासार्हता फार मोठी आहे, असे अजिबात नाही, पण राहुल गांधींची मात्र विश्वासार्हता फार कमी आहे, ही मात्र वस्तुस्थिती आहे आणि राहुल गांधींनी कुठला विषय हातात घेतला की त्याची माती झालीच म्हणून समजा, अशी त्यांची “ख्याती” असल्याने ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मांडलेला महाभियोग पराभूत होणार हे निश्चित असेल.

    ज्ञानेश कुमारांना नवी संधी

    वास्तविक ज्ञानेश कुमार यांना हटवायचे असेल किंबहुना त्यांना expose करायचे असेल किंवा त्यांचा पक्षपात उघडकीस आणायचा असेल, तर त्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मार्ग विरोधकांसाठी खुला आहे, पण विरोधक सुप्रीम कोर्टात जात नाही. त्याऐवजी राजकीय बिनडोकपणा दाखवून महाभियोगासारखा नसता उद्योग करून ज्ञानेश कुमार यांना पुनर्प्रस्थापनाची संधी देत आहेत. यापलीकडे यातून काही साध्य होण्याची सुतराम शक्यता नाही.

    Rahul Gandhi’s failure in targeting Om Birla and Gyanesh Kumar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Retail Inflation : फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई वाढून 3.21% झाली; खाद्यपदार्थ महाग होण्याचा परिणाम

    विलीनीकरणाचा विषय हवेत विरला; महाराष्ट्रातला उंट काँग्रेसच्या तंबूत शिरला!!

    Maharashtra LPG : राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही; गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष