विशेष प्रतिनिधी
मुंबई : Radhakrishna Vikhe Patil, मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत महायुती सरकारने 2 सप्टेंबर रोजी जारी केलेला जीआर मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यावर मंत्रिमंडळाच्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसींचे आरक्षण जाणार आहे याचे काही पुरावे आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. ओबीसी आरक्षण कमी होतंय किंवा जाणार आहे अथवा कमी होणार आहे याचे काही पुरावे आहेत का? हा राईचा पर्वत का उभा राहत आहे हेच मला कळत नाही? असे ते म्हणालेत.Radhakrishna Vikhe Patil,
राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची ग्वाही दिली आहे. त्यानुसार मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्यामुळे विनाकारण ओबीसी विरुद्ध मराठा असे तेढ का निर्माण होत आहे? हे मला समजत नाही. ओबीसी आरक्षण कमी होतंय, जाणार आहे, कमी होणार आहे याचे काही पुरावे आहेत का? हा राईचा पर्वत का उभा राहत आहे हेच मला कळत नाही?
छगन भुजबळ राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. मी नेहमीच त्यांचा आदर करतो. ते काय बोलले त्याची मला कल्पना नाही. ते गैरसमजातून बोलले असतील. परंतु, एवढी वर्षे सार्वजनिक जिवनात काम करताना मला कधिही मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाल्याचे जाणवले नाही. सगळेजण एकत्रच राहतात, असे ते म्हणाले.
ही ओबीसींची आणि ती मराठ्यांची दिवाळी असे कधी झाले आहे काय?
मराठा आरक्षणाप्रकरणी कोर्टात 5 याचिका दाखल झाल्यात. काही याचिका सर्वोच्च न्यायालयातही दाखल आहेत. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करता येणार नाही. या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया चालू राहील. आपण ती थांबू शकत नाही. तिथे प्रत्येकजण आपली भूमिका मांडेल. पण पुरोगामी महाराष्ट्रात इतक्या वर्षात सर्व समाजाची माणसे एकत्र राहतात. निवडणुका एकत्र लढवतात. सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात. ही ओबीसींची दिवाळी आणि ती मराठ्यांची दिवाळी असे कधी झाले आहे काय? सर्व सण व महापुरुषांच्या जयंत्या सर्वजण मिळूनच साजरे करतात. मग हे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत आहे? हा प्रश्न मला नेहमी पडतो, असे विखे पाटील म्हणाले.
हैदराबाद गॅझेटियर लागू होणे हा जनतेचा हक्क होता
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच आमच्या डीएनएमध्ये ओबीसी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केव्हाच झाला नाही. यापूर्वी झाला नाही आणि उद्याही करण्याचा काही कारण नाही. त्यामुळे मी म्हणालो की, आरक्षण कमी होत आहे याचे तुमच्याकडे काही उदाहरण आहे का? मराठा बांधवांची मागील अनेक वर्षांची इच्छा होती. मराठवाड्याचा काही भाग सोडला तर उर्वरित राज्यात अनेक लोक यापूर्वीच कुणबी झालेत. त्यामुळे हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणे हा तेथील जनतेचा अधिकार होता. त्यांच्या मनात आपल्यावर अनेक वर्षे अन्याय झाल्याची भावना होती. ती दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. हा प्रयत्न सरकार कायद्याच्या चौकटीत बसून करत आहे. हे करताना ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
भुजबळांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करणार
विखे पाटलांनी यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करणार असल्याचेही सांगितले. छगन भुजबळ महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांना भेटून समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सरकारने या प्रकरणी शिंदे समिती नियुक्त केली होती. या समितीने दिलेल्या अहवालाच्या निष्कर्षांनुसार सरकार कारवाई करत आहे. उपसमितीचा अध्यक्ष म्हणून काम करताना मला कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे लागते. त्यामुळे मी, भुजबळ व न्यायमूर्ती शिंदे आम्ही तिघेही एकत्र राहून हा निर्माण झालेला विसंवाद दूर करण्याचा प्रयत्न करू, असेही विखे पाटलांनी यावेळी स्पष्ट केले.
24 तासांत प्रमाणपत्र मिळाल्याचा आरोप खोटा
छगन भुजबळांनी प्रशासकीय अधिकारी अवघ्या 24 तासांत कुणबींचे प्रमाणपत्र देत असल्याचा आरोप केला आहे. पण विखे पाटलांनी हा भुजबळांचा गैरसमज असल्याचा दावा केला आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला असे 24 तासात दाखले देता येत नाहीत. हा छगन भुजबळांचा गैरसमज आहे. या प्रकरणी गाव स्तरावर ज्या समित्या नेमल्या आहेत, त्या समित्याकडे लोक अर्ज करत आहेत. आत्ता अनेक गावचे लोक माझ्याकडे समित्या गठीत झाल्या नसल्याची तक्रार करत आहेत. अर्ज स्वीकारल्यानंतर त्याची पडताळणी करणे, मग ते नायब तहसीलदारांकडे जाणे, तो दाखला मिळाल्यानंतर ते जातपडताळणी जाणे ही एक प्रक्रिया आहे. हा मार्ग कुणीच बदलला नाही. त्यामुळे 24 तासांत सर्टिफिकेट मिळत असल्याचा गैरसमज त्यांचा कुणीतरी करून दिला आहे. असे अजिबात कधी घडत नाही. व्हेरिफिकेशनसाठी लागणारा कालावधी हा आत्ताही पूर्वीसारखाच लागत आहे.
या प्रकरणी नाहक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विनाकारण ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा वाद व विसंवाद थांबवण्याची गरज आहे. पुरोगामी महाराष्ट्राला अशा प्रकारची विचारधारा परवडणारी नाही, असे विखे म्हणाले.
जरांगेंचे कौतुक अन् ओबीसी नेत्यांवर टीका
विखे पाटील म्हणाले, मनोज जरांगे यांनी अतिशय प्रामाणिकपणे हे आंदोलन चालवले आहे. त्यांनी वेळोवेळी समाजाची भूमिका मांडली. त्यांनी हे आंदोलन निस्वार्थपणे हे आंदोलन केले. सरकारने कायद्याच्या चौकटीत बसूनच त्यांच्या मागण्यांवर विचार केला. या प्रकरणी शिंदे समिती नेमली केली. त्यांनी त्यात खूप काम केले. त्यामुळे त्यांना ते चौथी शिकले अशी टीका करून तुम्ही त्यांची टीका करत आहात. कुणीही शिक्षणाबद्दल बोलू नये.
तुम्ही फार शिकलेले आहात आणि तुम्ही फार शहाणे आहात तर मग तुम्ही तुमचा शहाणपणा लोकांना भडकावण्यासाठी का वापरता. सध्या महाराष्ट्रात काही लोकांमध्ये दुसऱ्यांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास निर्माण झाला आहे. पण त्यांना हे कळत नाही, आपल्या हव्यासामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. या लोकांना यांची दिवाळी साजरी करायची आहे. त्यामुळे त्यांनी हे वाद निर्माण केलेत. बाकी काहीच नाही, असेही विखे यावेळी बोलताना म्हणाले.
Radhakrishna Vikhe Patil Challenges Critics of Maratha Reservation: Asks for Proof That OBC Quota is Threatened; Reaffirms CM’s Guarantee
महत्वाच्या बातम्या
- Belgian Court : फरार मेहुल चोक्सीला भारतात परत पाठवण्यास मंजुरी; बेल्जियम न्यायालयाचा निकाल
- Pakistan Airstrike, : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; युद्धबंदीचा भंग, सीमावर्ती भागातील अनेक घरे लक्ष्य
- पश्चिम महाराष्ट्रातल्या स्वबळाची शिंदे सेनेकडून चाचपणी; शासनाच्या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचविण्यावर भर!!
- Amit Shah : अमित शहा म्हणाले- तेजस्वींचा नोकरीचा दावा खोटा, 3 लाख कोटींचे बजेट, पगार वाटण्यासाठी 12 लाख कोटी गरजेचे आहेत, कुठून आणणार?