विनायक ढेरे
नाशिक : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या दिल्लीवारीच्या बातम्या मराठी मीडिया तिखट – मीठ लावून दाखवताना दिसतो आहे. त्या दिल्लीत दाखल झाल्याच्या बातम्या ब्रेकिंग न्यूज म्हणून चालविल्या गेल्या. त्या दिल्लीत आल्या म्हणजे जणू काही फार मोठी राजकीय घडामोड घडणार, असे चित्र मराठी मीडियाने रंगविले आहे.
असल्या रिपोर्टिंगमधून मोदी – शहा किती बधतील, हे सांगता नाही येणार… पण मराठी मीडियात पंकजांच्या दिल्ली दौऱ्याच्या बातम्या ज्या पध्दतीने रंगविण्यात येताहेत ना, ते पाहून शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या बातम्यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. १९९१ पासून २०२१ पर्यंत ३० वर्षे मराठी मीडियाने नियमितपणाने शरद पवारांच्या अशाच पंतप्रधानपदाच्या बातम्या छापल्या, दाखविल्या, ब्रेकिंग न्यूज केल्यात. पण त्याने पवारांना पंतप्रधानपद तर सोडाच पण आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाचा बोजही टिकवता आलेला नाही.
तशीच काहीशी अवस्था पंकजांच्या दिल्ली दौऱ्याची होताना दिसते आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या ११ राष्ट्रीय चिटणीसांपैकी एक राष्ट्रीय चिटणीस आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बोलावलेल्या राष्ट्रीय चिटणीसांच्या बैठकीला हजर राहण्यासाठी त्या दिल्लीत आल्या आहेत. महाराष्ट्रातून विजया रहाटकर आणि विनोद तावडे हे राष्ट्रीय चिटणीस देखील आजच्या बैठकीला उपस्थित आहेत.
या बैठकीत जी काही चर्चा – निर्णय होईल, तो राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर आणि विशेषतः पक्षाच्या संघटनात्मक बाबीवर होईल. यात प्रीतम मुंडे यांच्या कथित मंत्रिपदाचा विषय चर्चेला येण्याची सुतराम शक्यता नाही. आणि आलाच तर त्याला दाद द्यायला जे. पी. नड्डा हे खुळे राष्ट्रीय अध्यक्ष नाहीत.
मूळात पंकजांनी आपण नाराज नाही, असा खुलासा केला आहे. पण त्यातही त्यांनी जर आपण नाराज नसल्याचे सांगत समर्थकांच्या राजीनाम्याचा दबाव भाजपश्रेष्ठींवर आणण्याचा प्रयत्न चालविला असेल, तर धन्यच आहे, त्यांच्या राजकीय समजाची… असल्या राजीनामा अस्त्रांनी मोदी – शहाच काय भाजपसारख्या मोठ्या पक्षाचा कोणताही नेता बधणार नाही. हे समजण्याइतपत पंकजा मुंडे या राजकीय समंजस असाव्यात असे वाटते.
मुंडे समर्थकांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. वगैरे बातम्या मराठी मीडियात छापून आणणे आणि टीव्हीवर दाखविणे ठीक आहे. यातून फारतर मीडियात झळकल्याचे आणि आपण महाराष्ट्रातले फार मोठे नेते आहोत, असा समज करून घेण्याचे पंकजांना समाधान मिळेल. आपल्या समर्थकांना तसे दाखविताही येईल.
पण त्यातून भाजपला काही फरक पडले अशी सुतराम शक्यता नाही. आणि तसेही भाजप किंवा काँग्रेस यांच्या सारख्या मोठ्या पक्षांना असल्या रिपोर्टिंगचा काही फरक पडत नसतो. काँग्रेसच्या राजकीय गलितगात्र अवस्थेत देखील कोणत्याही नेत्याबाबत काँग्रेसश्रेष्ठी मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे निर्णय घेत नाहीत. पंकजांच्या बाबतीत तर भाजपसारखा मोठा पक्ष, ज्याचे नेतृत्व मोदी – शहांकडे आहे. त्यामुळे ते असल्या राजीनाम्याच्या अस्त्रांना बधून कोणता घेण्याची शक्यताच उद्भवत नाही. हे समजण्याइतपत पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे या राजकीयदृष्ट्या समंजस असाव्यात, असे वाटते… अन्यथा…
pankaja munde in delhi; will she be able to draw attention of BJP leadership over issue of cabniet breth for preetam munde?
महत्त्वाच्या बातम्या
- आसामच्या मुख्यमंत्र्यांचे सावरकरवादाकडे दमदार पाऊल…!!
- लष्करातील महिलाशक्ती काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात लढणार, आसाम रायफल्सच्या महिला सैनिकांवर जबाबदारी
- राहूल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचे बैलांनाही आवडले नाही, देवेंद्र फडणवीस यांचा टोला
- केवळ बरोबर चालले म्हणून कर्नाटक कॉँग्रेसच्या अध्यक्षाने एकाच्या कानशिलात लगावली
- स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनला मिळणार जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन सूचीत स्थान मिळणार