नाशिक : जंग जंग पछाडले, पद काही मिळेना; पण स्वतःच्या तोंडून महत्त्वाकांक्षा जाहीर करायची हौस काही फिटेना!!, असंच म्हणायची वेळ जय पवार यांच्या आजच्या वक्तव्याने आली.
– सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार
जय पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीची महत्त्वाकांक्षा जाहीर करून टाकली. त्या बारामतीच्या आमदार आहेतच 2019 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून बारामतीची निवडणूक लढवावी. ही आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे, असे वक्तव्य जय पवार यांनी केले. त्यासाठी त्यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेचा देखील हवाला दिला.
पण पवार कुटुंबीय आणि देशातील सर्वोच्च पदे यांचे काय अही – नकुल म्हणजेच साप मुंगसाचे नाते आहे, समजत नाही. पवार कुटुंबीयांपैकी कोणालाच सर्वोच्च पद मिळत नाही, पण स्वतःच्याच तोंडाने बोलून त्याची महत्त्वाकांक्षा जाहीर केल्याशिवाय त्यांना राहावत सुद्धा नाही. हा अनुभव आत्तापर्यंत शरद पवार, अजित पवार यांनी घेऊन झाला. आता तो अनुभव घ्यायची वेळ सुनेत्रा पवारांवर आली.
– पवारांची 35 वर्षांची महत्त्वाकांक्षा
शरद पवारांनी 1991 पासून पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा पाहिली. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या राजकीय कोलांट्या मारल्या. ते काँग्रेसमध्ये राहिले काँग्रेसचे अध्यक्ष पदाची निवडणूक लढवून पाहिली, पण तिथे त्यांना अपयश आल्यानंतर ते काँग्रेस मधून बाहेर पडले. पण कोणत्याही स्थितीत, कोणत्याही राजकीय परिस्थितीत त्यांना पंतप्रधान पद मिळू शकले नाही. देशाचे भावी पंतप्रधान म्हणून शरद पवारांनी आपल्या समर्थकांना झुलवत ठेवले आणि पंतप्रधानपदाने हुलकावणी देऊन शरद पवारांना झुलवत ठेवले. त्यापलीकडे पवारांच्या बाबतीत बाकी काही घडले नाही.
– अजितदादांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा
अजित पवारांनी सुद्धा मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने भरपूर पाहिली. त्यासाठी ते काकांबरोबर राहिले. काकांनी सुद्धा त्यांना अनेक वेळा उपमुख्यमंत्री केले, पण त्यांना एकदाही मुख्यमंत्री केले नाही. शेवटी अजित पवारांनी काकांची साथ सोडली, पण त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही. मुख्यमंत्रीपदाने त्यांना कायमची हुलकावणी दिली.
– पोस्टर वरचे मुख्यमंत्री
शरद पवारांना महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांना खुर्चीवर बसलेले पाहायचे होते. पण त्यांची ती महत्त्वाकांक्षा सुद्धा पूर्ण होऊ शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे, अजित पवार, रोहित पवार आणि आता सुनेत्रा पवार या सगळ्यांना पोस्टर वरच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्च्यांवर बसवून ठेवले, पण प्रत्यक्षातली खुर्ची त्यांच्या नशिबीच आली नाही.
– इतरांना मिळाली मोठी पदे
वास्तविक कधी कुठल्या नेत्याने स्वतःहून मोठ्या पदाचे महत्त्वाकांक्षा जाहीर केली, तर ती त्याला मिळाली असे घडलेले नाही. उलट ज्या नेत्यांनी कधी मोठ्या पदांची स्वप्ने पाहिली नाहीत, त्या नेत्यांना त्या पदांनी माळ घातली. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान होऊन गेले. प्रणव मुखर्जी पंतप्रधान झाले नाहीत, पण ते राष्ट्रपती झाले. प्रतिभा पाटलांनाही अनपेक्षित पणे राष्ट्रपती पद मिळून गेले. रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू यांनी तर कुठल्याच मोठ्या पदांची स्वप्ने पाहिली नाहीत. पण त्यांना राष्ट्रपती पद मिळाले. यापैकी कुठल्याही नेत्याने स्वतःच्या तोंडाने मोठ्या पदांची महत्त्वाकांक्षा जाहीर केली नाही तरीसुद्धा त्यांना ती पदे भूषविता आली.
– पवार कुटुंबीय राहिले तसेच…
त्या उलट शरद पवारांना गेली 35 वर्षे पंतप्रधान पदांनी कायमची हुलकावणी दिली. पवार कुटुंबीयांमधल्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. कारण या सगळ्यांनी स्वतःच्या तोंडाने मोठ्या पदांची महत्त्वाकांक्षा जाहीर केली. तीच चूक त्यांना राजकीय दृष्ट्या कायमची नडली. त्यांना महाराष्ट्रात आणि देशात मोठे राजकीय शत्रू तयार झाले. तेच त्यांच्यापेक्षा बळकट ठरले. पवारांचे सगळेच राजकीय कर्तृत्व तोकडे पडले. त्यामुळे त्यांची मोठ्या पदांची महत्त्वाकांक्षा अधुरी राहिली. पण म्हणून स्वतःच्याच तोंडाने महत्त्वाकांक्षा जाहीर करायची हौस नाही फिटली, हेच राजकीय सत्य जय पवार यांच्या तोंडून बाहेर आले!!