प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याचे सांगून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लॉकडाऊन लावण्याचा गंभीर इशारा देत आहेत आणि दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष,NCP minister jayant patil breaks corona rules
मंत्री जयंत पाटील हे कार्यकर्त्यांच्या सभेत तुमच्याकडे पाहून वाटतेय, कोरोना नाहीच,म्हणून मी मास्क काढून बोलतो, अशी विधाने करताहेत. शिवाय या सभेत कोरोना नियमावलीचाही भंग झालेला दिसतोय. कारण सभा जरी बंदिस्त हॉलमध्ये होती, तरी सभेत लोकांच्या संख्येची मर्यादा पाळण्यात आल्याचे दिसले नाही.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमधील ही विसंगती आज समोर आली. मुख्यमंत्र्यांनी कोरोना प्रतिबंधावर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यापूर्वीच त्यांनी लॉकडाऊनचा इशारा देऊन झाला आहे.
त्याचीच री आज अजित पवारांनीही ओढली आहे. आणि जयंत पाटलांनी मात्र, या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या विधानाच्या विसृंगत विधान केले आहे.
पंढरपूर तालुक्यातील रांझणीच्या सभेत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, की तुमचे सर्वांचे चेहरे पाहून जगात करोना नाही, असे मला वाटतेय म्हणून मी पण मास्क काढून बोलतो.
या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियात महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या परस्पर विरोधी वक्तव्याची चर्चा सुरू झाली. कोरोनासारख्या गंभीर प्रश्नावर राज्य मंत्रीमंडळातीलच वरिष्ठ मंत्रीच असे विधान करत असतील तर जनता त्यांच्या प्रतिसादाला काय प्रतिसाद देणार यावर चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे या सभेतील व्यासपीठावरील नेत्यांच्या तोंडावर आणि समोरील गर्दीच्या चेहऱ्यावरही मास्क नव्हते. त्यामुळे ही पोटनिवडणूक पंढरपूर तालुक्यातील जनतेला कोरोनाच्या फैलावात अडकवणार का, अशीही चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झालीय.