प्रतिनिधी
नाशिक : नाशिकचे चर्चेतील पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. ते महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलीस महानिरीक्षक असतील. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची मुंबई व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेत महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Nashik Police Commissioner Deepak Pandey
दीपक पांडे आणि कृष्ण प्रकाश हे वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिलेले पोलीस अधिकारी आहेत. दीपक पांडे यांनी महसूल विभागातील अधिकारी आरडीएक्स बॉम्ब सारखे आहेत. ते मनमानी करतात, असे पत्र मध्यंतरी त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाठवले होते. त्यावरून त्यांना राज्य सरकारने नोटीस देखिल बजावली आहे.
नाशिक मध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी ते चर्चेत राहिले होते. मध्यंतरी नववर्ष स्वागत समितीला कार्यक्रम करू देण्यावरून देखील त्यांनी विषय ताणून धरला होता. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी भोंग्यांचे डेसिबल मोजण्याचे आदेश काढून मनसेच्या भोंग्यांना ते लावण्या पूर्वीच चाप लावला होता. त्यांच्या जागी आता जयंत नाईकनवरे हे नाशिकचे पोलिस आयुक्त असतील.
पिंपरी-चिंचवडचे आयुक्त कृष्णप्रकाश यांची देखील बदली करण्यात आली असून ते व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचे महानिरीक्षक असतील. मध्यंतरी आपल्याच नावाने खंडणी मागणारे एका युवकाला कृष्णप्रकाश यांनी ट्रॅप लावून रंगेहात पकडले होते. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय हस्तक्षेपाच्या विरोधात जाऊन त्यांनी अनेक निर्णय घेतले होते. अंकुश शिंदे आता पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त असतील.