विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai-Pune मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (शनिवार) दुपारी खोपोली परिसरातील बोरघाटात एक अत्यंत भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने 25 ते 30 हून अधिक वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात सुमारे 30 ते 35 प्रवासी जखमी झाले असून, एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.Mumbai-Pune
मिळालेल्या माहितीनुसार, सदरील अपघात खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत, नवीन बोगदा ते फूडमॉल हॉटेल दरम्यान, मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर दुपारी घडला. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरचा ताबा सुटल्याने, त्याने समोर असलेल्या एकामागोमाग एक अशा अनेक चारचाकी, खासगी आणि मालवाहू वाहनांना जोरदार धडक दिली. अपघातातील वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून, काही गाड्या अक्षरशः चक्काचूर झाल्या आहेत. काही वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात बचाव पथकांना यश आले आहे. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलिस, महामार्ग सुरक्षा पथक आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. 30 ते 35 प्रवासी किरकोळ ते गंभीर स्वरूपाच्या दुखापतींनी जखमी झाले असून, त्यांना खोपोलीतील नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 20 ते 22 जणांना पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. परिसरातील ग्रामपंचायतींकडून अतिरिक्त रुग्णवाहिका मागवण्यात आल्या आहेत.
वाहतूक ठप्प, पुनः सुरळीत करण्याचे प्रयत्न
या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. वाहतूक पोलिस आणि महामार्ग प्राधिकरणाकडून वाहने बाजूला करण्याचे व वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अपघातामुळे अनेक वाहनचालक रस्त्यावर अडकून पडले आहेत, त्यामुळे स्थानिक स्तरावर मदत व पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
सध्या खोपोली पोलिस आणि महामार्ग सुरक्षा विभाग अपघाताची तपासणी आणि पंचनामा करत असून, कंटेनर चालकाच्या वैद्यकीय तपासणीसह अपघाताच्या नेमक्या कारणांची चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार ब्रेक फेल हे कारण असल्याचे समोर आले असले, तरी इतर कोणतेही तांत्रिक दोष आहेत का याचीही चौकशी केली जात आहे.
मागील 4 वर्षांत 500 हून अधिक अपघात
दरम्यान, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर जानेवारी 2021 ते जून 2025 या कालावधीत तब्बल 500 हून अधिक अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 300 हून अधिक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, शनिवारी झालेल्या कंटेनर अपघाताने घाटातील अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Mumbai-Pune Expressway Accident: Container Hits 25+ Vehicles, Injured
महत्वाच्या बातम्या
- लोचटगिरीची हद्द… काँग्रेसचा नेता म्हणे, राहुल गांधी दुसरे आंबेडकर होऊ शकतात !
- Aparajita : बलात्कारविरोधी ‘अपराजिता विधेयक’ राज्यपालांनी परत पाठवले; कठोर शिक्षांवर केंद्र सरकारचे आक्षेप
- Bengaluru : बंगळुरू चेंगराचेंगरी; कुन्हा आयोगाने म्हटले- RCB, इव्हेंट कंपनी आणि राज्य क्रिकेट असोसिएशन जबाबदार
- महाराष्ट्राच्या इतिहासात 70 वर्षांमध्ये झाली नाही, एवढी गेल्या 150 दिवसांमध्ये बदनामी; सुप्रिया सुळेंच्या “जावईशोधाची” नोंद फडणवीस सरकारने गॅझेट मध्ये करावी!!