• Download App
    NCP विलीनीकरणाचे टाकावे लागले शस्त्र; पवार विरुद्ध पवारचा उलटला डाव!!

    विलीनीकरणाचे टाकावे लागले शस्त्र; पवार विरुद्ध पवारचा उलटला डाव!!

    नाशिक : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचे टाकावे लागले शस्त्र आणि पवार विरुद्ध पवार हा डाव सुद्धा उलटला!!, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले हे वास्तव आज सुप्रिया सुळे यांच्या तोंडून बाहेर आले.

    सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दा सोडून दिला, त्याचवेळी बारामती मध्ये काहीही झाले, तरी पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली. किंबहुना त्यांना ती करावी लागली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सगळेच राजकीय फासे उलटे पडल्याने सुप्रिया सुळे यांना पक्षाची भूमिका बदलावी लागली.

    विलीनीकरणाचा फसला डाव

    अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा डाव टाकून अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देऊन तो डाव उधळून लावला होता. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मराठी माध्यमांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विषय जिवंत ठेवून बरीच धडपड करून पाहिली, पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही. उलट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचे पकड अधिक घट्ट होत गेली. त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना सुद्धा शरद पवारांचा राष्ट्रवादीचे नेते परिणामकारकरीत्या हात लावू शकले नाहीत.

    प्रचारात सुद्धा भाग नाही

    त्यानंतर झालेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुरुवातीला शरद पवारांनी काँग्रेसला उचकवून उमेदवार उभा करायचा डाव खेळला. पण त्यामध्ये सुद्धा पवारांना यश आले नाही. उलट सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा लागला. भले स्वतः शरद पवारांनी तब्येतीच्या कारणास्तव सुनेत्रा पवारांच्या प्रचारात भाग घेतला नाही पण त्यांनी सुप्रिया सुळे यांना देखील प्रचारासाठी पाठवले नाही. शेवटी सुप्रिया सुळे फक्त प्रचाराच्या सांगता सभेला उपस्थित राहून भाषण करून तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचायच्या आधीच निघून गेल्या.

    पवार विरुद्ध पवार

    बारामतीतल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतले मतदान सुरू असतानाच आमदार रोहित पवारांनी पवार विरुद्ध पवार असा डाव टाकला 20,२9 च्या निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना होईल, असे रोहित पवारांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे सगळ्याच पवार कुटुंबाची मोठी राजकीय पंचाईत झाली. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर सुद्धा पवारांच्या कुटुंबात एकोपा राहिला नाही, असे चित्र महाराष्ट्रभर गेले. त्यामुळे श्रीनिवास पवारांना सगळ्याच तरुण पवारांना झापावे लागले. शरद पवारांनी आपल्या नातवंडांसाठी स्नेहभोजन आयोजित करून त्यांची समजूत घालावी लागली.

    सुप्रिया सुळे यांना द्यावी लागली कबुली

    या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या विषयावर पडदा टाकला. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण व्हावे, अशी अजित पवारांची इच्छा होती पण आज अजित पवारच नाहीत, त्यामुळे विलीनीकरणाचा विषय पुढे येत नाही, अशी कबुली सुप्रिया सुळे यांना द्यावी लागली‌. त्याचवेळी पवार विरुद्ध पवार हा विषय सुद्धा महाराष्ट्रभर पोहोचल्याने मी बारामतीत कधीच पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ देणार नाही, असे जाहीर करावे लागले. वेळप्रसंगी मी स्वतः वेगळा निर्णय घेईन, पण बारामती मध्ये कधीच पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ देणार नाही, अशी “गर्जना” सुप्रिया सुळे यांनी केली. २०२९ च्या निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या कुठल्या आघाड्या होतील हे माहिती नाही. हे त्या वेळचे त्यावेळी ठरविण्यात येईल. पण काहीही झाले तरी मी बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ देणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या किंबहुना त्यांना तसे म्हणावे लागले. सुप्रिया सुळे यांनी दिलेली ही मुलाखत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या डावपेचांचे मोठे अपयश अधोरेखित करून गेली.

    Merger of both NCPs falied forever

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीत संघर्ष, फडणवीस यांची भेट; त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे नितेश राणेंबरोबर एकाच रथात मिरवणुकीत!!

    मोदींनी मेलोडी चॉकलेटच्या एका पॅकेट मध्ये पटवली इटलीची पंतप्रधान; राहुल गांधींच्या बुडाला लागली जुनीच आग!!

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाची धडपड; सगळ्याच नेत्यांची सत्तेच्या तुकड्यासाठी तडफड!!