प्रतिनिधी
कोल्हापूर – मराठा आरक्षणासाठी बिगर राजकीय मोर्चे काढणारे आंदोलन आता सर्वपक्षीय बनले आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या आंदोलनात आता सर्व पक्षांचे नेते दाखल झाले आहेत. Maratha agitation starts in kolhapur; MP Sambhaji raje and chandrakantdada patil on the same dias
कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सकल मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून शाहू महाराजांच्या समाधीस्थळी आंदोलन सुरू झाले आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्या बरोबर मालोजीराजे भोसले, हातकणंगलेचे शिवसेना खासदार खासदार धैर्यशील माने, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अॅड. प्रकाश आंबेडकर, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे हे नेते आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.
मराठा आंदोलनावरून संभाजीराजे आणि चंद्रकांतदादा पाटील यांची राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली. संभाजीराजे हे राज्यातल्या ठाकरे – पवार सरकाराचा दोष झाकण्यासाठी सौम्य आंदोलन करीत असल्याची टीका चंद्रकांतदादांनी केली तर त्याला संभाजीराजेंनी प्रत्युत्तर दिले. आपण भाजपकडे खासदारकी मागायला गेलो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती सन्मानाने दिली, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
संभाजीराजे यांची खासदारकीची मुदत लवकरच संपत आहे. या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचे आहे. त्यांनी कोल्हापूरातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढविण्याची तयारी चालविल्याचीही चर्चा आहे.
आता आंदोलनस्थळी सर्वपक्षीय नेते एकत्र आले असताना ते काय भाषणे करतात, कोणत्या मागण्या करतात, याकडे सकल मराठा समाजाचे लक्ष आहे.