• Download App
    Ajit Pawar : "मनोहर पर्रिकर यांचा आदर्श!" महिलेचा अजित पवारांना सल्ला

    Ajit Pawar : “मनोहर पर्रिकर यांचा आदर्श!” महिलेचा अजित पवारांना सल्ला

    Ajit Pawar

    विशेष प्रतिनिधी

     

    पुणे : Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील केशवनगर-कोंढवा भागात तीन विकासकामांची पाहणी करण्यासाठी आले असताना नागरिकांनी त्यांना वाहतूक समस्येवरून घेरले. या पाहणी दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओत, वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असणारी एक महिला अजित पवारांना गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा आदर्श घेण्याचा सल्ला देत आहे.

    आपल्या दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या अजित पवारांना आज एका महिलेनेच धारेवर धरले. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या आक्रमक भाषाशैली आणि थेट खडे बोल सुनावण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांना आज त्यांच्याच शैलीत उत्तर मिळाले. नेहमीप्रमाणे अजित पवार पहाटे विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. ते मुंढवा आणि केशवनगर भागातील उड्डाणपूलांची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळाची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या सांगण्यासाठी अजित पवारांभोवती गर्दी केली. वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा अजित पवारांसमोर वाचला.



    नेमकं काय आहे त्या व्हिडिओत?

    संबंधित व्हिडिओत अजित पवार एका महिलेला उद्देशून म्हणतात, “तुम्ही येण्याआधी आम्ही समस्या ऐकल्या आहेत. काहींनी निवेदन दिले आहे. यामध्ये वेगवेगळ्या एजन्सींचा समावेश आहे. नागरिकांना ज्या सुविधा हव्या आहेत, त्याबाबत आम्ही शंभर टक्के सहमत असून त्या संदर्भात आमचे काम सुरू आहे. आम्हाला उशीर झाल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि त्या कामांना अधिक गती कशी देता येईल, ते पाहतो.” त्यावर ती महिला म्हणाली, “आम्हाला खूप आशा आहेत. ज्याप्रमाणे पर्रिकर ट्रॅफिक पाहण्यासाठी दिवसा फिरायचे, तसेच तुम्हीही कधीतरी ट्रॅफिकच्या वेळी येऊन पाहायला हवे. असे नाही की माहिती मिळू शकत नाही.” यावर अजित पवार थोडे गोंधळलेले दिसले आणि त्यांनी त्या महिलेला विचारले, “पर्रिकर कोण?” त्यावर ती महिला म्हणाली, “पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते. ते ट्रॅफिक पाहण्यासाठी दिवसा फिरायचे, तसेच तुम्हीही कधीतरी फिरून पाहा. न सांगता भेटी द्या. तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही सांगणार, असे होऊ नये.”

    यानंतर अजित पवार थोडे चिडल्याचे दिसले. त्यांनी संबंधित महिलेवर संतापून म्हटले, “आम्ही प्रश्न विचारायला आलेलो नाही. मी स्वतः या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी आणि सर्व काही ठीक व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे.” त्यानंतर त्या महिलेने पुन्हा अजित पवारांना खडबडीत उत्तर देत म्हटले, “इथल्या समस्या पाहता येथे राहायचे की नाही, हा प्रश्न पडला आहे.” त्यानंतर महिलेने स्पष्ट केले की, “आम्ही तुमच्या कार्यपद्धतीवर संशय घेत नाही, पण आमच्या समस्या जाणून घेणे महत्त्वाचे आहे.”

    अशा प्रकारे, अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या अजित पवारांना आज त्याच औषधाची गोडी चाखावी लागली.

    “Manohar Parrikar’s role model!” Woman’s advice to Ajit Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    प्राकृतिक कृषी संमेलन 2025 : महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीचे पुढचे हब बनविण्याचा संकल्प!!

    Fadnavis : फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय- बांगलादेशी घुसकोरांना बसणार आळा, ब्लॅक लिस्टसह शिधा पत्रिका पडताळणीचे निर्देश

    राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या आमदाराच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस + मनोज जरांगे एकत्र; राज्यभरात चर्चेला उधाण!!