वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनचा मोठा फटका एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे.परंतु ‘गरज ही शोधाची जननी’ या उक्तीप्रमाणे एसटीने ‘महाकार्गो ‘च्या माध्यमातून मालाची वाहतूक करून 56 कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. Maharashtra State Trasport (ST) earned 56 crore by transporting goods through ‘MahaCargo’.
एसटीला प्रवासी नसल्यामुळे प्रचंड आर्थिक फटका बसला. परंतु एसटी महामंडळाने मालवाहतुकीचे आपले काम सुरूच ठेवले. यासाठी एसटीने ‘महाकार्गे’ नावाने मालवाहतूक सेवेला सुरुवात केली आहे. खासगी कंपन्यांच्या तुलनेत कमी दर आणि सुरक्षित सेवा यामुळे महाकार्गेने गेल्या वर्षभरात मालवाहतुकीतून 1 कोटी 40 लाख किलोमीटरचा टप्पा पार केला असून महामंडळाच्या तिजोरीत 56 कोटींचा महसूल जमा केला आहे.
गेल्या वर्षी 21 मे 2020 पासून एसटी महामंडळाने राज्यभरात अतिशय माफक दरात मालवाहतूक सेवा सुरू केली. मालवाहतुकीला मिळालेला प्रतिसाद पाहून महामंडळाने ‘महाकार्गो’ या नावाने हा ब्रँड विकसित केला. त्यामुळे मालवाहतुकीचे ट्रक आता आकर्षक आणि नव्या रूपात ‘महाकार्गो’ या नावाने रस्त्यावर धावत आहेत. राज्यातील प्रत्येक जिह्यात विभाग नियंत्रकांमार्फत मालवाहतुकीचे नियोजन केले जाते.
100 कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट
एसटी महामंडळाने पुढील वर्षभरात मालवाहतुकीतून 100 कोटीपर्यंत महसुलाचे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार केला आहे. विविध शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या मालवाहतुकीपैकी 25 टक्के काम एसटी महामंडळास देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मालवाहतुकीसंदर्भात अधिक माहितीसाठी 022-23024068 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले.