• Download App
    कीर्ती शिलेदार यांचे निधन|Kirti Shiledar is no more

    कीर्ती शिलेदार यांचे निधन

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : संगीत नाटक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे आज निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. कीर्ती शिलेदार यांना वडील जयराम आणि आई जयमाला शिलेदार यांच्याकडून कलेचा वारसा मिळाला. विद्याधर गोखल्यांचे ‘स्वरसम्राज्ञी’ हे खास शिलेदारांसाठीचे नाटक होय. यातील तमाशातील मैनेची भूमिका अत्यंत गाजली. तमाशातल्या मैनेपासून शास्त्रीय संगीत गाणाऱ्या घरंदाज गायिकेपर्यंतच्या अनेक छटा दाखविण्यासाठी कीर्ती शिलेदारांनी प्रचंड मेहनत घेऊन ही भूमिका ताकदीने सादर केली.Kirti Shiledar is no more

    त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून संगीत रंगभूमी गाजवली आहे. विविध संगीत नाटकांचे त्यांनी चार हजारांहून अधिक प्रयोग सादर केले आहेत. देशविदेशात संगीत नाटकांचे प्रयोग, नाट्यपदांच्या मैफली, सप्रयोग व्याख्याने त्यांनी दिली आहेत. पारंपरिक संगीत नाटकांप्रमाणेच स्वरसम्राज्ञी, अभोगी, मंदोदरी आदी वेगळ्या धाटणीची नाटकेही त्यांनी आपल्या स्वराभिनयाने गाजवली आहेत.

    कीर्ती जयराम शिलेदार यांचा जन्म पुणे येथे १६ ऑगस्ट १९५२ रोजी झाला. वडील आणि आई जयमाला रंगभूमीवरील गायक व नट असल्यामुळे संगीत व अभिनय यांचे संस्कार त्यांच्यावर लहानपणीच झाले. वयाच्या दहाव्या वर्षी शिलेदारांच्या ‘त्रिपात्री’ ‘सौभद्र’ पासून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. ‘संगीत सौभद्र’ या नाटकातील नारदाची भूमिका त्यांनी प्रथमच केली आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. संगीत आणि अभिनय याचे धडे घेत असतानाच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मराठी या विषयातील ‘बी.ए. ‘ची पदवीही कीर्ती शिलेदार यांनी मिळविली.



    विद्याधर गोखलेंच्या ‘स्वरसम्राज्ञी’ या नाटकाच्या निमित्ताने कीर्ती यांना नीळकंठबुवा अभ्यंकर गुरु म्हणून लाभले. अभ्यंकरबुवांच्या तालमीत वाढलेल्या कीर्ती शिलेदार शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीत, ठुमरी अशा विविध संगीत प्रकारांत तयार झाल्या. आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेतूनच दोनदा त्यांचे गायन प्रसारित झाले. त्यांच्या १९०० च्या आसपास मैफली झाल्या.

    अनेक जुन्या संगीत नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. रुक्मिणी, सुभद्रा, मंथरा, द्रौपदी, वसंतसेना, रेवती अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी संगीत रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. रंगतदार, ढंगदार गायकीबरोबरच त्यांचे २ लयीवरदेखील प्रभुत्व दिसून येई. तबला व पखवाज : वाजवण्यातही त्या निपुण होत्या.

    कीर्ती शिलेदारांनी २७ नाटकांतून ३४ भूमिका केल्या असून साडेचार हजारांवर संगीत नाटकांचे प्रयोग केले आहेत. दीप्ती भोगले (लता शिलेदार) या त्यांच्या ज्येष्ठ
    भगिनींच्या संगीत नादलुब्ध मी’ आणि ‘संगीत चंद्रमाधवी’ या दोन्ही नाटकांचे संगीत दिग्दर्शनही कीर्ती शिलेदार यांनी केले. पारंपरिक संगीत नाटकांचा विचार आणि बदलत्या काळानुसार नावीन्याचा अंतर्भाव त्यांच्या संगीत नाटकात आणि संगीतातही दिसतो. ‘चंद्रमाधवी’ या नाटकाच्या संगीतासाठी त्यांना ‘झी’चा ‘सर्वोत्कृष्ट संगीत’ पुरस्कार मिळाला.

    कीर्ती शिलेदारांनी ‘स्वर-ताल-शब्दसंगती’ हा संगीतातील शब्दार्थाचे आणि काव्यार्थाचे महत्त्व सांगणारा शोधनिबंध लिहिला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ तर्फे विविध भाषक विद्यार्थ्यांकडून त्यांनी हिंदी भाषेतून नाट्यगीते गाऊन घेतली. एन. एस. डी. तर्फे झालेल्या ‘एकच प्याला’ च्या प्रकल्पामध्येही त्यांचा सहभाग होता. तसेच, ‘संगीत शारदा’ या नाटकाचा हिंदी नाट्यांशही त्यांनी सादर केला. संगीत नाटक अकादमीच्या समितीवरही त्या पाच वर्षे होत्या.
    नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.

    महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००९), नाट्यदर्पण रजनीचा ‘नाट्यव्रती’ सन्मान (१९९९), पुणे महापालिकेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००६) हे त्यांना मिळालेले काही मानसन्मान होत. नुकतेच त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘मम सुखाची ठेव ‘ हा लघुपट त्यांच्या भगिनी दीप्ती भोगले यांनी प्रदर्शित केला आहे.

    Kirti Shiledar is no more

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, 14 जानेवारीपूर्वी 3 हजार येणार, मकरसंक्रांती-निवडणूक जुळल्याने विरोधक आक्रमक

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, वारसा नाही, उद्धव ठाकरेंवरही निशाणा

    Supriya Sule : सुळेंनी केला मोठा खुलासा- शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का? रोहित पवार राज्यात, तर सुप्रियाताई केंद्रात मंत्री होणार का?