विशेष प्र्तिनिधी
मुंबई : Jai Pawar दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय अजित पवार यांनी एक भावनिक आणि संतप्त पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. माझ्या वडिलांना आपण गमावले, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे, असे म्हणत त्यांनी आपली व्यथा व्यक्त केली. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह मुख्य वैमानिकाच्या आसनावर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत असल्याचा दावा केला आहे. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, हे अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.Jai Pawar
जय पवार यांनी नागरी उड्डाण महासंचालनालयाकडे तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत व्हीएसआरची सर्व विमाने उड्डाणबंदी करावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. ही एका मुलाची आर्त हाक असून प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी न्याय मिळावा, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.Jai Pawar
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात हवाई उड्डाण मंत्रालयाच्या AAIB या तपास यंत्रणेचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या या दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. अहवालात कमी दृश्यमानता, दृश्यमान उड्डाण नियमांचे संभाव्य उल्लंघन आणि नियंत्रण नसलेल्या विमानतळावरील सुरक्षेतील त्रुटी याकडे गंभीर लक्ष वेधण्यात आले आहे. या अहवालामुळे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.
या अहवालावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, तपास यंत्रणेने सादर केलेला प्राथमिक अहवाल त्यांनी वाचला असून तो पूर्ण आणि सखोल स्वरूपात तयार नसल्याचे दिसते. केवळ औपचारिक माहिती देऊन चालणार नाही, तर सत्य, पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरांची अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला तसेच या अपघातात प्रियजन गमावलेल्या कुटुंबांना आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक माध्यमावर लेखी प्रतिक्रिया देत त्यांनी अधिक सखोल चौकशीची मागणी केली.
जय पवार यांनी नागरी उड्डाण महासंचालनालयाने DGCA ज्या मुद्यावर व्हीएसआर व्हेंचर्सच्या काही विमानांना उड्डाणबंदी केली आहे, त्याच मुद्द्यांवर इतर विमानांतही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले. जर सुरक्षेच्या नियमांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील, तर केवळ काही विमानांवर कारवाई न करता संपूर्ण ताफ्याबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक असल्यास संपूर्ण विमान ताफ्याचे संचालन थांबवण्याचा विचार करावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
अपघाताच्या तपशीलाबाबत अहवालात नमूद आहे की, मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या विशेष उड्डाणाने धावपट्टी क्रमांक 11 वर उतरायचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात वैमानिकाने पुन्हा फेरी मारली. दुसऱ्या वेळी क्षेत्र दिसत आहे, अशी माहिती देण्यात आली. मात्र हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने तीन किलोमीटर इतकी दृश्यमानता नोंदवली होती, जी दृश्यमान उड्डाण नियमांनुसार आवश्यक असलेल्या पाच किलोमीटरपेक्षा कमी होती. उतरायची परवानगी मिळाल्यानंतर काही क्षणांतच विमान धावपट्टीच्या डाव्या बाजूला सुमारे पन्नास मीटर अंतरावर झाडांवर आदळले आणि त्यानंतर लागलेल्या आगीत पूर्णपणे नष्ट झाले.
प्राथमिक निष्कर्षांनुसार कमी दृश्यमानता असूनही उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष उड्डाणासाठी नियंत्रण नसलेल्या विमानतळावर कार्यवाही झाली. हवामान आणि मूलभूत मार्गदर्शक साधनांमध्ये कमतरता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. बारामती येथे अधिकृत हवामान नोंद सुविधा उपलब्ध नाही. उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके होते आणि दोन हजार ते अडीच हजार मीटर इतकी दृश्यमानता नोंदली गेली होती. या सर्व बाबींचा अपघातावर परिणाम झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तपास पारदर्शकपणे करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
बारामती विमानतळावरील सुरक्षेतील त्रुटीही या अहवालात अधोरेखित करण्यात आल्या आहेत. धावपट्टीवरील चिन्हे स्पष्ट दिसत नव्हती, धावपट्टीवर बारीक खडी आढळली, परिपूर्ण कुंपण नव्हते आणि अग्निशमन सुविधा उपलब्ध नव्हती. या विमानतळावर केवळ दृश्यमान उड्डाणांना परवानगी असून नियमित नियंत्रण व्यवस्था नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जय पवार यांनी संपूर्ण तपास पारदर्शकपणे करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. या अहवालामुळे विमान सुरक्षा आणि नियमांच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
Jai Pawar Claims VSR Owner Rohit Singh Was Asleep in Cockpit VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- Iran war : इराण युद्ध: 48 नेते, 40 कमांडर, 9 नौदल जहाजे… 48 तासांच्या युद्धात इराणचे प्रचंड नुकसान
- तीन विमाने नष्ट झाली तरी अमेरिकेची इराणविरुद्धची मोहीम न नाही थांबणार; अमेरिकन लष्कर प्रमुखांचा इशारा
- काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांचा उद्धव ठाकरेंना फोन; शरद पवारांचा पत्ता राज्यसभेतून परस्पर कट!!
- Grok AI : AIने आधीच सांगितली होती इराणवर हल्ल्याची तारीख, Elon Musk यांनीही सांगितली ही बाब