विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींकडे बारकाईने पाहिले आणि त्या संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमधले “बिटवीन द लाईन्स” वाचले, तर शीर्षकात उल्लेख केलेला प्रश्न रास्त असल्याचेच स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पक्ष फुटाफुटी सुरू आहे की पक्षातून कोणाला बाहेर ढकलण्याच्या गंभीर हालचाली सुरू आहेत??, हा तो प्रश्न आहे!! Is NCP really splitting or is sharad Pawar pushing ajit Pawar out of NCP??
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष यांच्यातल्या हालचालींच्या काही कड्या जोडल्या की त्याचा जास्त उलगडा होईल.
एक तर महाविकास आघाडीच्या फक्त दोन वज्रमूठ सभा झाल्या आहेत. त्यातही उद्धव ठाकरेंना प्राधान्य दिल्याने अजितदादा अस्वस्थ असल्याच्या बातम्या आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांचे कथित बंड झाले. ते शरद पवारांनी स्वतः राजकीय हालचाली करून थंड केले अशाही बातमी आल्या. यापैकी नेमकी बातमी खरी कोणती आहे?, तर दोन्ही मध्ये तथ्य असल्याचे दिसून येते.
उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे फक्त 15 आमदार आणि 3 खासदार आहेत. महाविकास आघाडीतला आता तो सर्वात मोठा नव्हे, तर सर्वात छोटा पक्ष झाला आहे, तरी देखील माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून समोर आणले जात असताना अजितदादा जर चिडले असतील तर ते स्वाभाविक मानण्याकडे राष्ट्रवादीतल्याच बड्या नेत्यांचा कल आहे.
या खेरीज खुद्द राष्ट्रवादीमध्येच अशा काही घडामोडी घडल्या आहेत, की ज्यातून अजितदादांचे बंड हा विषय सुरू झाला आहे. लोकमत मध्ये नमूद केलेल्या बातमीनुसार, या बातम्या भुलाभाई देसाई मार्गावरून ठाण्यापर्यंत अनेक ठिकाणाहून पसरवण्यात आल्याचे नमूद केले आहे. सिल्वर ओक बंगला भुलाभाई देसाई मार्गावर आहे. यातच सगळे आले!!
या बातमी मागेही एक विशिष्ट राजकीय लॉजिक आहे… जर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही उद्धव ठाकरे माघार घ्यायला तयार नाहीत आणि सत्ता जाऊन 9 महिने उलटल्यानंतरही उद्धव ठाकरे गट मोठा संघर्ष सहानुभूती मिळवत आहेत आणि त्या सहानुभूतीचा फायदा होण्याची शक्यता आहे, असे काही सर्वेक्षणातून समोर आले आहे. अशा स्थितीत जर शिवसेनेत फूट पडल्यानंतर हे उद्धव ठाकरे हेच सहानुभूतीच्या लाटेच्या आधारे पुन्हा एकदा मोठा पक्ष होणार असतील तर अशीच सहानुभूतीची लाट राष्ट्रवादीत का निर्माण करता येऊ नये??, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या चाणक्यांना पडला असेल, तर तो गैर मानता येणार नाही.
पण मग राष्ट्रवादीसाठी अशी सहानुभूतीची लाट निर्माण होणार तरी कशी?? यातून तर अजितदादांच्या बंडाचे स्क्रिप्ट लिहिले गेले नाही ना??, अशा दाट संशयावर राजकीय वर्तुळात खोलवर चर्चा आहे.
शिवसेनेत ज्यावेळी फूट पडली, त्यावेळी सर्व आमदारांनी संजय राऊत यांच्यावर प्रचंड आगपाखड केली होती. आज तशीच आगपाखड स्वतः अजितदादा यांनी सुरू केली आहे. त्यांच्या गटात सध्या नेमके कोण आहे हे जरी उघड झाले नसले तरी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांचे त्यांना पाठबळ असल्याचेही बोलले जात आहे. कारण सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या संघर्षात सुप्रिया सुळे यांचा विशिष्ट मान राखून पक्षाचे नेतृत्व अजितदादांकडेच द्यावे, असा मेसेज अजितदादांच्या गोटातून राष्ट्रवादीच्या चाणक्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. त्यामुळे ही मूळ लढाई अजितदादांच्या भाजप पक्षप्रवेशाची नसून सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा अशीच असल्याचे बातम्यांमधून स्पष्ट झाले आहे.
त्या पलीकडे जाऊन अजितदादा संजय राऊतांवर सध्या संतप्त आहेत. कारण संजय राऊतांनी राष्ट्रवादीतली अंतर्गत बातमी सामनातून फोडली आहे आणि त्यानंतर आज देखील राष्ट्रवादीचे काही घडते आहे, तो त्यांचा अंतर्गत मामला आहे, असे त्यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. संजय राऊत यांच्या या दोन हालचालींची संगती लावली, तर राष्ट्रवादीत अजिबातच काही अलबेला नसल्याचे सूचित होते आणि इथेच खरी “राजकीय मेख” आहे!!
अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यासाठी कंपल्सिव्ह वातावरण तयार करणे हा तर राष्ट्रवादीच्या चाणक्यांचा डाव असल्याचे यातून दिसत आहे. कारण एकदा अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले, मग त्यांच्यामध्ये कितीही आमदार असोत अथवा नसोत, साताऱ्यातल्या पावसासारखी आपल्या बाजूने सहानुभूतीची लाट तयार तयार करता येते आणि ही नवी सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंच्या आधीच निर्माण झालेल्या सहानभूतीच्या लाटेला काटशह देऊ शकते, असा राष्ट्रवादीचा चाणक्यांचा होरा असू शकतो.
या नव्या सहानुभूतीच्या लाटेची पार्श्वभूमी अजितदारांच्या बंडाचे स्क्रिप्ट लिहून तयार केली जाते आहे का??, अशी शंका आहे. याचा अर्थ 2024 पूर्वी पुतण्या की मुलगी हे ठरविण्याचा निर्णायक क्षण राष्ट्रवादीच्या चाणक्यांपुढे उभा ठाकल्याचे ते निदर्शक आहे!!
Is NCP really splitting or is sharad Pawar pushing ajit Pawar out of NCP??
महत्वाच्या बातम्या
- अतिक अहमदच्या कबरीवर तिरंगा ठेवणाऱ्या काँग्रेस नेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- ट्विटरने कोणालाही सोडले नाही! राहुल गांधी, योगींपासून ते शाहरुख-सलमानपर्यंत सर्वांच्या हटवल्या लेगसी ब्ल्यू टिक्स
- भारताच्या लोकसंख्येवर चीनने म्हटले- संख्या नव्हे, गुणवत्ता महत्त्वाची, चीनचे परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- आमचे 90 कोटी लोक कामाचे, त्यांच्यात टॅलेंटही आहे
- कॉंग्रेसने इतिहास पळवला, स्वत:ला हवा तसा लिहून घेतला; सावरकर स्मारकातून मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल