वृत्तसंस्था
सातारा : बिगर निवासी मिळकतधारकांची लॉकडाऊनमधील तीन महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय सातारा पालिकेने घेतला आहे. असा निर्णय घेणारी सातारा ही राज्यातील पहिली पालिका ठरली आहे. In Satara For Non Residential Properties Exemption of house tax for three months
2020 ते 2021 या आर्थिक वर्षासाठी सहा हजार 697 मालमत्ताधारकांना सुमारे 71 लाख 57 हजार 13 रुपयांची सूट मिळणार आहे. याबाबतची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांच्यातर्फे देण्यात आली आहे.
बिगर निवासी मिळकतधारकांची तीन महिने घरपट्टी माफ करण्याचा विषय सातारा पालिकेच्या विशेष सभेने मंजूर केला. तो प्रस्ताव खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला होता. बिगरनिवासी तसेच निवासी मिळकतधारकांना तीन महिन्यांची घरपट्टी माफी देण्याची मागणी केली होती. निवासी मिळकतधारकांच्या सवलतीबाबत मंत्रालयीनस्तरावर कार्यवाही सुरु आहे, असे उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केले.
केंद्राकडून अतिरिक्त निधी मिळवून आणि प्रशासकीय खर्चात बचत करून घरपट्टी माफीतून होणारी तूट भरुन काढण्यात येणार आहे, असे उदयनराजे भोसले यांनी पत्रकात नमूद केले आहे.