• Download App
    Pratap Sarnaik : शेतकऱ्यांच्या मुलांची पिळवणूक करणाऱ्या कला केंद्रांचे परवाने तात्काळ रद्द करा

    Pratap Sarnaik : शेतकऱ्यांच्या मुलांची पिळवणूक करणाऱ्या कला केंद्रांचे परवाने तात्काळ रद्द करा

    Pratap Sarnaik

    विशेष प्रतिनिधी

    धाराशिव : Pratap Sarnaik :  सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली कला केंद्रांमध्ये अवैध व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या मुलांची आर्थिक पिळवणूक होत असल्यास अशा केंद्रांचे परवाने तातडीने रद्द करण्याचे निर्देश धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत. कला केंद्रांच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे बेकायदा धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

    गेल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे एका तरुणाने नर्तिकेच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून तणावात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, एका कुटुंबाला पोरकेपणाला सामोरे जावे लागल्याने समाजात हळहळ व्यक्त होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथील तुळजाई कला केंद्रात नर्तिका पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून सातत्याने पैसे, सोने आणि जमिनीची मागणी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाने कला केंद्रांमधील गैरप्रकार आणि अवैध धंद्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.



    धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पारगाव येथील तुळजाई कला केंद्रातील पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्या मृत्यूच्या प्रकरणावर परखडपणे भाष्य केले. “कला केंद्रांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या मुलांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत असेल, तर अशी सर्व कला केंद्रे तात्काळ बंद करा. लोककला ही महाराष्ट्राची सांस्कृतिक संपदा आहे आणि ती जिवंत राहिली पाहिजे. मात्र, या नावाखाली कोणतेही अवैध धंदे चालवले जाणार नाहीत,” असे कठोर शब्दांत त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

    पारगाव येथील तुळजाई कला केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी सादर केला आहे. या कला केंद्रात नर्तिका पूजा गायकवाड कार्यरत होती. गोविंद बर्गे याच्या आत्महत्येमुळे कला केंद्रांमधील गैरप्रकार आणि अवैध धंद्यांवर टीकेची झोड उठली आहे. पालकमंत्री सरनाईक यांनी आजच्या बैठकीत प्रशासनाला सूचना देताना सांगितले की, जर तुळजाई कला केंद्राप्रमाणे इतर कला केंद्रांमध्येही असे गैरप्रकार आढळले, तर त्यांचे परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई करावी. त्याचबरोबर, लोककला जिवंत ठेवताना कला केंद्रांचा प्रश्न संवेदनशीलपणे हाताळण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    सांस्कृतिक वारसा जपताना कला केंद्रांनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे. या प्रकरणामुळे कला केंद्रांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाकडून याबाबत कठोर पावले उचलली जाण्याची अपेक्षा आहे.

    Immediately cancel the licenses of art centers that exploit farmers’ children.Pratap Sarnaik

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold Price : सोने तब्बल 1,029 रुपयांनी वाढून 1.11 लाखांच्या सर्वोच्च पातळीवर; चांदीचाही प्रति किलो ₹1.29 लाखांचा विक्रमी उच्चांक

    Beed railways : बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न साकार; उद्या पहिली रेल्वे धावणार, मराठवाड्याच्या विकासाला चालना

    Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन प्रकरणी छगन भुजबळ यांना दिलासा, चिमणकर बंधूंनाही दोषमुक्ती