विशेष प्रतिनिधी
मुंबई : गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप वर टोमणे बॉम्ब फोडला आहे. महाविकास आघाडीचे काम चांगले सुरू आहे. पण विरोधक सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारत आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजप वर शरसंधान साधले. मुंबईत जीएसटी भवनाच्या समारंभात ते घरातून ऑनलाईन सहभागी झाले होते. Gudhi padva: On the eve of Gudhi Padva, the Chief Minister scolded BJP !!
महाविकास आघाडीत विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहमंत्रालयाच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याचे चित्र प्रसार माध्यमांनी शिवसेनेतील सूत्रांच्या आधारे काल दिले होते. परंतु सायंकाळपर्यंत त्या मतभेदाच्या चित्रावर रंगसफेदी करण्यात आली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत कोणतेही मतभेद नाहीत. आपले सहकारी उत्तम काम करीत आहेत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या. बातम्या महाविकास आघाडीतल्या मतभेदाच्या होत्या. पण मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर भाजपवर शरसंधान साधले.
आपल्या नेहमीच्या भाषेत टोमणे बॉम्ब फोडताना मुख्यमंत्र्यांनी भाजपने त्यांना महाराष्ट्रात वातावरण बिघडवण्याचे काम करत असल्याचा आरोप केला. त्यांना स्वतःच्या कामाची गुढी उभारता आली नाही. पण ते सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारत आहेत, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना मारला. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते.