नाशिक : संजय राऊतांची शिंदे सेनेत संशय पेरणी; पण ठाकरे आणि राऊतांच्या नादी लागून शिंदे करतील का आत्मघाती कृती??, असा सवाल समोर आलाय.Eknath Shinde will not do any political mistake
मुंबईत भाजपा – शिवसेना महायुतीने 118 जागा मिळवून पूर्ण बहुमत मिळवले त्यामुळे महायुतीचाच महापौर होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले असले, तरी देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे सेनेत आज संशय पेरणी केली. मुंबईमध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपचा महापौर होऊ नये अशी सर्वांची भावना आहे. शिंदेसेनेतून अनेक नगरसेवक निवडून आलेत. ते मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांची सुद्धा शिवसेनेचाच महापौर मुंबईत बसावा, अशी इच्छा आहे. एकनाथ शिंदे यांनी हॉटेलमध्ये या नगरसेवकांना कोंडून ठेवले असले, तरी आज संदेश वाहनाची असंख्य साधने उपलब्ध असताना वेगवेगळ्या मार्गांनी ठाकरेंपर्यंत त्यांचे संदेश पोहोचत आहेत. आम्ही तटस्थपणे या घटनांकडे बघत असलो तरी पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी या नियमित पत्रकार परिषदेत केले. या वक्तव्यातून त्यांनी शिंदे सेनेत संशयाची पेरणी केली. ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊन शिवसेनेचा महापौर बसवतील, असे सूचित केले.
– उपमुख्यमंत्री पद सोडतील का
पण संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे एकनाथ शिंदे हे कुठली राजकीय खेळी करून स्वतःचा राजकीय आत्मघात करून घेतील का??, हा खरा सवाल या निमित्ताने समोर आला आहे. एकनाथ शिंदे महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचे 11 सहकारी राज्याच्याच मंत्रिमंडळात मंत्री आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिंदे सेनेला केंद्रात एक मंत्रीपद दिले आहे. महायुतीला एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून शिंदेंना भाजपने स्थान दिले आहे.
– भाजप “स्वबळावर” सत्ता टिकवेल
अशा राजकीय अनुकूल स्थितीत केवळ मुंबईच्या महापौर पदासाठी ठाकरेंशी तडजोड करून एकनाथ शिंदे राज्यातली शिंदे सेनेच्या वाट्याची सत्ता गमावतील का??, हा खरा सवाल आहे. कारण राज्यातले महायुतीचे सरकार एकनाथ शिंदे यांच्या 56 आमदारांच्या पाठिंब्यामुळे भक्कम झाले असले तरी ते त्यांच्या एकमेव पाठिंब्यावर टिकून राहिलेले नाही. उलट आज भाजपने ठरविले, तर एकनाथ शिंदेंचे आमदार फोडून आणि अजित पवारांचे आमदार फोडून भाजप “स्वबळावर” सत्ता टिकवू शकतो. तेवढी त्यांची आमदार संख्या निश्चित आहे. कारण भाजपकडे स्वतःचेच 132 आमदार आहेत. 10 अपक्षा आमदार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मार खाल्ल्यानंतर अजित पवार तसेही राजकीय दृष्ट्या गलितगात्र झाले आहेत. त्यामुळे ते भाजपच्या सत्तेची वळचण स्वतःहून सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी 56 आमदारांच्या पाठिंबा काढून घेतला, तरी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पडण्याची सुतराम शक्यता नाही. उलट एकनाथ शिंदे यांना आमदार गमवावे लागतील.
– ठाकरेंच्या नादी लागायची शक्यता नाही
अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांच्याकडे एवढे तारतम्य आणि राजकीय बुद्धिमत्ता निश्चित आहे, की मुंबईचे महापौर पद किंवा अन्य कुठल्या शहराचे महापौर पद घेऊन ते राज्यातली महत्त्वाची सत्ता गमावण्याची शक्यता नाही. ते स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांच्या नजरेतून उतरवून घेण्याची शक्यता नाही. कारण तसे केले, तर त्याची फार मोठी राजकीय वैयक्तिक किंमत चुकवावी लागेल याची त्यांना पक्की जाणीव आहे. म्हणूनच संजय राऊत यांनी कितीही संशय पेरणी केली, तरी एकनाथ शिंदे हे ठाकरे आणि राऊत यांच्या नादी लागण्याची शक्यता नाही.
Eknath Shinde will not do any political mistake
महत्वाच्या बातम्या
- Chabahar Port : परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण- चाबहार बंदराबाबत भारताला एप्रिलपर्यंत सवलत, अमेरिकेसोबतही चर्चा सुरू
- Rafale Jets : भारत 114 राफेल जेट्स खरेदी करणार; मेक इन इंडिया अंतर्गत तयार होतील; संरक्षण मंत्रालयाच्या समितीची मंजुरी
- ZP च्या निवडणुकीत अजितदादा कोणता वादा करणार??; काय मोफत देणार??; जाहीरनामा लिहिणारी कंपनी अजितदादांना कोणता सल्ला देणार??
- Sajad Lone : जम्मू-काश्मीरला दोन स्वतंत्र राज्ये बनवण्याची मागणी; सज्जाद लोन म्हणाले- सलोख्याने वेगळे होण्यावर विचार करण्याची वेळ