• Download App
    Eknath Shinde एकनाथ शिंदेंनी भाजपच्या धोक्याची घंटा ओळखली, की मराठी माध्यमांनीच लांडगा आला‌ रे ची घंटा वाजवली??

    एकनाथ शिंदेंनी भाजपच्या धोक्याची घंटा ओळखली, की मराठी माध्यमांनीच लांडगा आला‌ रे ची घंटा वाजवली??

    नाशिक : एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या धोक्याची घंटा ओळखली की मराठी माध्यमांनीच लांडगा आला रे ची घंटा पुन्हा वाजवली??, असा सवाल विचारायची वेळ मराठी माध्यमांनी दिलेल्या बातमीने आली.

    – शिंदे सेना स्वतंत्र गट नोंदणी

    मराठी माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार एकनाथ शिंदे यांनी म्हणे, भाजपची धोक्याची घंटा ओळखली. म्हणूनच त्यांनी मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या नगरसेवकांची स्वतंत्र गट नोंदणी न करता, त्यांची जर भाजपच्या नगरसेवकांबरोबर महायुतीची नगरसेवक म्हणून गट नोंदणी केली असती, तर मुंबई महापालिकेतले सगळे अधिकार भाजपच्या गटनेत्याकडे राहिले असते. त्यामुळे महापालिकेतल्या वेगवेगळ्या समित्यांवर महायुतीने स्वतःचे नगरसेवक नेमताना भाजपनेच स्वतःचे अधिकार वापरले असते. एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांना एक तर कमी जागा दिले असत्या, किंवा त्यांना अधिकारहीन ठेवले असते, म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या वर्चस्वाचा धोका वेळीच ओळखून शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतला, अशी बातमी मराठी माध्यमांनी चालवली.



    – नसलेल्या सूत्रांच्या हवाल्याने बातमी

    प्रत्यक्षात ही बातमी असलेल्या किंवा नसलेल्या सूत्रांच्या हवाल्याने चालवली गेली आहे. पण भाजप किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने या बातमीची पुष्टी केली नाही. त्यामुळे मराठी माध्यमांचा हा परस्पर जावईशोध असल्याचेच राजकीय वास्तव समोर आले. अर्थातच एकनाथ शिंदे यांनीही धोक्याची घंटा ओळखण्यापेक्षा मराठी माध्यमांनीच या बातम्यांच्या निमित्ताने लांडगा आला रे ची घंटा एकनाथ शिंदे यांच्या कानाशी वाजवली.

    – मराठी माध्यमांचा घंटा वाजवायचा छंद

    तशाही लांडगा आला रे च्या घंटा वाजवायाचा मराठी माध्यमांचा छंद आहे. भाजप पासून तुम्हाला धोका आहे, अशी घंटा मराठी माध्यमांनी एकनाथ शिंदेंच्या कानाशी वारंवार वाजवली. जणू काही मुख्यमंत्री राहून आणि उपमुख्यमंत्री राहून एकनाथ शिंदे यांना भाजपचा धोका कळतच नाही आणि ती घंटा वाजवायची जबाबदारी आपल्यावरच आहे, असा आव मराठी माध्यमांनी नेहमीच आणला. पण प्रत्यक्षात एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते मराठी माध्यमांचे बारसे जेवले आहेत त्यामुळे ते असल्या लांडगा आला रे धोक्याच्या घंटांना “घंटा सुद्धा” किंमत देत नाहीत.

    – भाजप आणि शिंदे सेना हे स्वतंत्रच पक्ष

    वास्तविक भाजपा आणि शिंदे सेना यांनी महायुती म्हणून निवडणूक लढवली असली तरी मुळातच ते दोन चिन्हांवर लढवली आहे. याचा अर्थच भाजप आणि शिंदे सेना मुळातच दोन स्वतंत्र पक्ष आहेत. त्यामुळे त्यांची गट नोंदणी कायद्यानुसार स्वतंत्रच होणे अपेक्षित आहे. जोपर्यंत स्वतःच्या इच्छेनुसार हे दोन्हीही पक्ष एकत्र गट नोंदणी करणार नाहीत, तोपर्यंत त्यांना एकत्रित गट मानता देखील येणार नाही. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे स्वतंत्रपणे गट नोंदणी करतील यात कुठलीही “बातमीच” नाही.

    – निर्णय फडणवीस आणि शिंदेंचा

    भाजपचे नेते किंवा एकनाथ शिंदे हे कुठल्याच माध्यमांना विचारून गट नोंदणीचा एकत्रित किंवा स्वतंत्र निर्णय घेणार नाहीत. किंबहुना या संदर्भातला निर्णय त्यांनी आधीच घेतलाही असू शकतो, पण तो माध्यमांना त्यांनी सांगितलेला नाही. मुंबई महापालिकेतले एकूण संख्या आणि नव्याने निर्माण झालेली सत्तारचना यामध्ये महापालिकेच्या कुठल्याही गटनेत्याला काही विशिष्ट स्वतंत्र अधिकार असतील आणि तो स्वतंत्रपणे निर्णय घेईल, अशा अटकळी मराठी माध्यमांनी स्वतःच्या विशिष्ट बुद्धीने मांडल्या असल्या, तरी प्रत्यक्षात ती वस्तुस्थिती नाही. मुंबई महापालिकेतले नवा सत्ता पट पाहतात त्या संदर्भातला जो काही निर्णय होईल किंवा जे काही निर्णय होतील, ते सगळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघे एकत्र बसूनच घेतील आणि त्यांची अंमलबजावणी आपापल्या नगरसेवकांकडून करून घेतील. यापलीकडे दुसरे काहीही घडण्याची शक्यता नाही, पण हे राजकीय वास्तव मराठी माध्यमांना पचले नाही, म्हणूनच असलेल्या किंवा नसलेल्या सूत्रांच्या हवाल्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या स्वतंत्र गट नोंदणीची बातमी देऊन शिंदे यांच्या कानाशी लांडगा आला रे ची घंटा पुन्हा वाजवली. त्यापलीकडे स्वतंत्र गट नोंदणीच्या बातमीचा दुसरा कुठलाही अर्थ नाही.

    Eknath Shinde recognized the warning signs from the BJP.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अमित शाहांनी गोळी मारली होती लखनौत, पण ती जाऊन लागली पाटण्यात!!

    अफगाण युद्धावर ट्रम्प यांच्या वक्तव्याने नाराज युरोपीय देश; ट्रम्प म्हणाले होते- नाटो अफगाणिस्तानमध्ये लढाईपासून दूर राहिले

    दावोस मध्ये झालेल्या गुंतवणूक करारांपैकी 83 % गुंतवणूक FDI स्वरुपात; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर