Thursday, 1 May 2025
  • Download App
    Eknath Shinde सत्तेची फळे चाखू; एकमेकांवरच चोथा फेकू!!

    सत्तेची फळे चाखू; एकमेकांवरच चोथा फेकू!!

    भाजपच्या वळचणीला बसून सत्तेची फळे चाखू; पण विरोधकांऐवजी एकमेकांवरच चोथा फेकू!!, असले प्रकार सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू आहेत.

    मालवणच्या राजकोट मध्ये नौदलाने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. हे प्रकरण महायुतीच्या नेत्यांनी इतक्या ढिसाळपणे हाताळले की विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करायला विशेष कष्टच घ्यावे लागले नाहीत. सत्ताधारी नेत्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांनी विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करायची आयती संधी दिली. दीपक केसरकर आणि नारायण राणे ही त्याची उदाहरणे ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही वाईट गोष्ट झाली. पण कधीकधी वाईटातून चांगले घडते. तसे याबाबतीत होईल, असे केसरकर म्हणाले. तर नारायण राणे यांनी एकेकाला खोलीत घेऊन रात्रीत मारून टाकीन असले वक्तव्य केले. वर्षानुवर्षे राजकारण करणाऱ्या अनुभवी नेत्यांना शोभणारी ही वक्तव्ये नव्हती. मग त्यांच्या वक्तव्यांच्या आधारे विरोधकांनी राजकारण केले, तर त्यांच्या नावाने बोंब मारण्यात काय मतलब आहे?? विरोधक तर राजकारण करणारच. ते राजकारण करायलाच बसलेत. पण बेताल वक्तव्ये करून विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिले कुणी??, सत्ताधारी अनुभवी नेत्यांनीच ना!!, त्याची काय गरज होती??

    पण त्या पलीकडे जाऊन खऱ्या गेमा करताहेत ते अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना. त्यातही अजितदादांची राष्ट्रवादी जास्त. “सत्तेची फळे चाखा आणि मित्रपक्षांवरच चोथा फेका!!” असला प्रकार अजितदादांच्या राष्ट्रवादीतून सुरू आहे. राजकोट पुतळा प्रकरणे अजितदादांनी मानभावीपणे महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागितली, पण त्यांच्याच राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी गेले तीन-चार दिवस रोज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत आहेत. जयदीप हा “आपटे” आहे म्हणून फडणवीसांना जाब विचारताहेत. अजितदादा पुढे येऊन मिटकरी यांना आवरत नाहीत. ते साळसूदपणे गप्प बसलेत.

    आजतर अजितदादांनी राजकोट वर जाऊन घटनास्थळाची पाहणी करताना जयदीप आपटे पळून पळून कुठे पळून जाईल??, त्याला आम्ही पकडूच, असे वक्तव्य करून जयदीपचे “आपटे” असणे स्वमुखातून अधोरेखित केले. त्यातून अजितदादांनी “डबल गेमच” खेळली. ते आज जरी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसले असले, तरी ते काकांचे पुतणे आहेत, हे विसरून कसे चालेल?? एकाच वेळी सत्तेची फळे चाखणे आणि मित्र पक्षांवरच दुगाण्या झोडणे ही काकांची काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीपासून सवय आहे. (याबद्दल पृथ्वीराज चव्हाणांना विचारा) काकांची ही सवय अजितदादांच्या पक्षाने नेमकी उचलली आहे. म्हणूनच ते आणि त्यांचे प्रवक्ते सत्ताधारी गोट अडचणीत येईल, अशी वक्तव्ये करत आहेत.


    Assam : आसाम विधानसभेने मुस्लीम विवाह आणि घटस्फोटाशी संबंधित विधेयक केले मंजूर


    शिवसेना – राष्ट्रवादीत धुमशान

    आता तर अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे धुमशान सुरू झाले आहे. शिंदेंचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात राष्ट्रवादी बरोबर बसताना उलट्या होत असल्याचे वक्तव्य केले. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील अजितदादांना सत्तेबाहेर पडण्याचा सल्ला दिला. या धुमशनातून सत्ताधारी गोटाच्या उरल्या सुरल्या राजकीय प्रतिष्ठेची वासलात लागते हे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना समजत नाही का??, ते समजत आहे, पण तरीही ते साळसूदपणे गप्प बसेलत. त्यांनी आपल्या अनुयायांना मोकाट सोडलेय. याचा अर्थच ते “डबल गेम” खेळत आहेत.

    या सगळ्या राजकारणात खरे तर भाजपची गोची आणि बदनामी होते आहे पण भाजप नेत्यांकडे आज तरी शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्या नाकात वेसण घालायची क्षमता उरलेली दिसत नाही. एरवी शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळावर फडणवीसांची पूर्ण छाप दिसली, पण आता ही छाप ढिल्ली पडली की काय??, अशी जाणवण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे.

    सासूच्या बळावर जावई सुभेदार

    तोकड्या जनमताच्या आधारावर प्रादेशिक पक्षांचे नेते दादागिरी करतात. त्यांना वेसण घालण्याची क्षमता खरं म्हणजे राष्ट्रीय पक्षांमध्ये पाहिजे. तिचा अभाव आज तरी भाजपमध्ये दिसतो आहे. एकनाथ शिंदे काय किंवा अजितदादा काय स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढवून आणि जिंकून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याची त्यांची क्षमता आहे का??, याचे उत्तर बिलकुल नाही, असे आहे, तरी देखील एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले आणि अजितदादांची देखील मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याची तीव्र इच्छा आहे, ती स्वबळावर नाही, तर इतरांच्या बळावर. “आईजीच्या जीवावर बाईजी उदार आणि सासूच्या बळावर जावई सुभेदार” असला हा प्रकार आहे. आता याच जावयाला “सुभेदार” करण्यापेक्षा त्याला वठणीवर आणण्याची खरी गरज आहे. ती भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी नेटाने रेट लावून पूर्ण केली पाहिजे. त्याशिवाय सत्तेची फळे चाखून एकमेकांवरच चोथा फेकणाऱ्यांना वेसण बसणार नाही.

    Eknath Shinde and ajit pawar playing double game with BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sarsanghchalak : सरसंघचालकांच्या हस्ते काशीमध्ये मजुराच्या मुलीचे कन्यादान; वराला म्हणाले- माझ्या मुलीची काळजी घ्या!

    Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले, जातीनिहाय जनगणनेचा निर्णय फसवा; पहलगामवर म्हणाले- फ्री हँड दिला म्हणणे चुकीचे!

    Chief Ministers Relief Fund जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे महाराष्ट्र दिनी उद्घाटन