विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची भूक भागविणाऱ्या हरित क्रांतीच्या जनकाने आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी जगाला अलविदा केला. भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन वयाच्या 98 वर्षी गेले. dr ms swaminathan passed away
1960 – 70 च्या दशकात अमेरिकेचा निकृष्ट मिलो गहू स्वीकारत रेशनच्या रांगेत उभ्या राहणाऱ्या भारतीयांच्या पिढ्यांनी भोगलेल्या दुःखाची कल्पना आज भरलेल्या पोटांना येणार नाही. पण हे दु:ख संपविण्याची कामगिरी डॉ. स्वामीनाथन यांनी केली.
आपल्या कर्तृत्वाने कोट्यवधी भारतीयांच्या पोटाची भूक शांत करण्यात मोलाचा वाटा ज्या कृषी ऋषीने बजावला त्या मुहूर्तमेढकाचे नाव म्हणजे डॉ. एम्. एस्. स्वामीनाथन!!
राष्ट्राने कृतज्ञ व्हावं असं हे आयुष्य ज्याने हजारो जीवांवर केलेल्या परिणामाचा हिशोब ठेवणेही अशक्य आहे. आज स्वतःला कृषी महर्षी म्हणून अनेक जण अनेक प्रकारे आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतात, पण या अन्नदात्याचे काम वादातीत आहे.
एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना करीत त्यांनी गव्हाचे उच्च उत्पन्न देणारे बियाणे विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
स्वामीनाथन यांनी विविध कृषी संशोधन प्रयोगशाळांमध्ये प्रशासकीय पदे भूषवली आणि क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषणपासून अनेक किताब, पुरस्कार मिळाले. त्यांच्या निधनाने देशाच्या कृषी क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे आदींनी डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली
“भारताला कृषि क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा. कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा, शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेला महान सुपुत्र आज भारत मातेने गमावला आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, “भारताची कृषी क्षेत्रातील, मृद व जलसंधारण क्षेत्रातील प्रगती ही डॉ. स्वामीनाथन यांच्या अखंड साधनेचे फलित आहे. त्यांच्या संशोधनाच्या आधारावर भारताने अन्नधान्य स्वयंपूर्णता प्राप्त केली. डॉ. स्वामीनाथन यांनी शेतमजूर, शेतकरी ते कार्पोरेट फार्मिंग याची मांडणी केली. भारतीय हरितक्रांतीचे जनक हे बिरूद त्यांनी अखंडपणे एक व्रत म्हणून सांभाळले. जागतिक स्तरावर डॉ. स्वामीनाथन ही आपल्या भारतीयांची एक महान बौद्धिक संपदा म्हणून पाहिले जात होते. अशा या भारत मातेच्या महान सुपुत्राच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे” असे सांगून मुख्यमंत्र्यांनी डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
dr ms swaminathan passed away
महत्वाच्या बातम्या
- मीडिया टायकून रूपर्ट मर्डोक यांचा फॉक्स आणि न्यूज कॉर्पचा राजीनामा; 70 वर्षे राहिले अध्यक्ष, मुलाला दिली जबाबदारी
- देवेंद्र 24×7 सामाजिक कामात, पण त्याने स्वतःसाठी एक दिवस तरी द्यावा, वेड्या बहिणीची वेडी ही माया!!
- केजरीवालांच्या अडचणी वाढणार? दिल्ली ‘CM House’च्या नूतनीकरण प्रकरणी CBI चौकशी करणार!
- खलिस्तानी आणि गँगस्टर्सच्या विरोधात ‘NIA’ची मोठी कारवाई; सात राज्यांत ५३ ठिकाणी छापे, अनेकांना अटक!