मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा नौदलाने उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला, ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक, पण त्यातून महाराष्ट्रात राजकारण उसळले. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर तुटून पडले. पण या सगळ्यामध्ये राजकारण साधून घ्यायला विरोधकांना नवा बकरा मिळाला आणि सगळे मिळून त्याला आपटायला लागले, एवढेच सत्य महाराष्ट्रासमोर उघड्यावर आले. Shivaji Maharaj
मालवणच्या शिव पुतळ्याच्या शिल्पकाराचे नाव जयदीप आपटे आहे, असे समजल्याबरोबर पवार आणि राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीचे राजकारण उसळले. त्यात ठाकरे देखील घुसले आणि सगळ्यांनी शिल्पकाराच्या नावाने “आपटीबार” काढले. संभाजी ब्रिगेडने जयदीप आपटेच्या घरासमोर आंदोलन केले. त्याच्या घरावर अंडी फेकून मारली. आम्ही आपटेला सोडणार नाही. त्याला आम्ही आपटू, अशी गर्जना राणे पुत्रांनी केली. सगळ्यांनी मिळून जयदीप आपटेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले. त्यासाठी सुषमा अंधारे यांनी मोठ्ठी पत्रकार परिषद घेतली. फोटोंचे प्रदर्शन केले. राणे + आपटे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उसळून जाऊन राणेंनी आपला सगळा इतिहास सांगत जयदीप आपटेला आपटण्याची “गर्जना” केली.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या सत्तेच्या वळचणीची फळे चाखून त्या फळांच्या बिया भाजपवरच थुंकल्या. अजितदादांनी भर स्टेजवरून संपूर्ण महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागितली, पण त्यांचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र ठरवून आपटे आडनावाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांनाच घेरले.
महायुतीतल्या नेत्यांनी देखील हे सगळेच प्रकरण अतिशय ढिसाळपणे हाताळले. एरवी अतिशय संयमाने प्रतिक्रिया व्यक्त करणारे दीपक केसरकर शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात पूर्ण घसरले आणि वाईटातून चांगले घडते असे बोलून त्यांनी “पक्षाघात” केला. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळा प्रकरणात स्पष्ट खुलासे केले, पण केसरकर यांच्या वक्तव्यामुळे सगळे मुसळ केरात गेले. महायुतीला बॅकफूटवर यावे लागले.
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाने आणि राज्य सरकारने चौकशी आणि तपास समिती नेमली. तिचे निष्कर्ष अजून बाहेर आलेले नाहीत, तरी देखील “स्वघोषित” आणि “स्वनिर्मित” निष्कर्ष बाहेर काढण्यात नाना पटोलेंसारखे ज्येष्ठ नेते देखील पुढे आले. त्यांनी जयदीप आपटेला परस्पर संघाचे स्वयंसेवकत्व देऊन टाकले. पुतळ्याच्या मस्तकावरील जखमेचा “इश्यू” अमोल मिटकरी आणि नानांनी उकरून काढला. त्यामध्ये सुषमा अंधारे यांनी भर घातली. यापैकी कोणीही मूर्तिशास्त्राचे तज्ञ नाहीत, तरी शिवाजी महाराजांचा पुतळा जयदीप नावाच्या आपटेने साकारला आहे हे समजल्याबरोबर अनेक नेते मूर्तिशास्त्राचे एकदम “तज्ञ” बनले.
या सगळ्या प्रकरणात जयदीप आपटे किंवा पुतळा प्रकरणात दोषी असलेल्या कोणाच्याही दोषांवर आणि गुन्ह्यांवर पांघरूण घालण्याचे कारण नाही. तसा सवालच पैदा होत नाही, पण चौकशी आणि तपास समितीचा वास्तववादी रिपोर्ट समोर येण्यापूर्वी जे नेते राजकारण साधून “आपटीबार” काढून महाराष्ट्रात जातीद्वेष फैलावत आहेत, त्यावर आघात करायची गरज आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. तो पुन्हा उभा केलाच पाहिजे. तो त्यांच्या कर्तृत्वाला साजेसाच असला पाहिजे याबद्दल दुमत असता कामा नये, पण जयदीप आपटेला कुठलाही अनुभव नसताना पुतळा उभारण्याचे कंत्राट दिले कसे आणि कोणी??, याची नीट आणि नेमकी छाननी झाली पाहिजे.
– रामपूरे यांची अंजन घालणारी प्रतिक्रिया
या संदर्भात ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांनी अतिशय संतुलित पण संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घालणारी प्रतिक्रिया व्यक्त केली. पुतळा उभारताना शिल्पकाराला राजकीय नेते कसा त्रास देतात, प्रत्येक टेबलावर कसे कमिशन मागतात, याची सविस्तर माहिती रामपुरे यांनी दिली. ती नीट वाचून किंवा ऐकून तिच्यासंदर्भात योग्य अंमलबजावणी केली पाहिजे. सगळेच काम “स्वस्तात मस्त आणि कमिशन खाऊन आम्ही राहू सुस्त”, असले असता कामा नये, याची दखल महायुतीच्या सरकारने घेतली पाहिजे. त्यात हयगय करता कामा नये. तशी हयगय शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात केली गेली असेल, तर संबंधित सर्व दोषींना कायद्याच्या बडग्याने ठोकूनच काढले पाहिजे. त्यासाठी विरोधक काढताहेत तसले नुसते “आपटीबार” कामाचे नाहीत.
– चेतन पाटीलने केले हात वर
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यासंदर्भात शिल्पकार जयदीप आपटे आणि इंजिनीयर चेतन पाटील या दोघांवरील गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटे फरार झाला, पण चेतन पाटील फरार झाला नसला, तरी त्याने गुन्ह्या संदर्भात हात वर करून तो मोकळा झाला. आपण फक्त चबुतऱ्याचे डिझाईन दिले. त्या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल एवढेच आपल्याला सांगितले गेले होते, वगैरे बतावणी त्यांनी केली. त्याबद्दल महाविकास आघाडीच्या कुठल्याच नेत्यांनी तोंड उघडले नाही. त्यामुळे चेतन हा “पाटील” आहे आणि जयदीप हा “आपटे” आहे म्हणूनच पवार आणि राष्ट्रवादी प्रवृत्तीच्या नेत्यांनी फक्त “आपटीबार” काढले, असा आरोप जर कोणी केला, तर त्यातले तथ्य नाकारता येणार नाही.
Dirty politics behind Shivaji Maharaj statue collapse issue
महत्वाच्या बातम्या
- Japan : जपानमध्ये तांदळाची तीव्र टंचाई, सुपरमार्केट्स झाली रिकामी, भूकंप-वादळाच्या भीतीने घराघरांत केला जातोय साठा
- काँग्रेसच्या सर्व्हेत राष्ट्रीय पक्षांनाच मोठ्या यशाची हमी; ठाकरे – पवारांचा नुसताच बोलबाला, प्रत्यक्षात ते 60 – 60 जागांचे धनी!!
- Shivaji Maharaj Statue : शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच अभियंता चेतन पाटीलने झटकले हात!!
- Farhatullah Ghauri’s : पाकिस्तानी दहशतवादी फरहतुल्ला गौरीची भारतावर हल्ल्याची धमकी; स्लीपर सेलला गाड्या रुळावरून उतरवण्यास सांगितले