विनायक ढेरे
नाशिक – भाजपच्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरांवरच्या नेतृत्वाबाबत नवी चर्चा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांच्या दोन वेगवेगळ्या राजकीय कृतींनी घडायला सुरूवात झाली आहे. Devendra fadanavis leadership; Narayan Rane and Pankaja munde makes opposite statements
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या बरोबरच महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना मित्रांना आणि हितचिंतकांना लिहिलेल्या आभारपत्रामध्ये तसा ठळक उल्लेख केला आहे. हे पत्र नारायण राणे यांनी आजच ट्विट केले आहे.
पण त्याचवेळी आजच मुंबईत समर्थकांच्या मेळाव्यात भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी मोदी – शहा – नड्डा हे आपले नेते आहेत, असे सांगितले. त्यांनी समर्थकांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले नाही. त्यावर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्याचा खुलासा पंकजांना विचारला. त्यावेळी पंकजांनी आपण राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे काम करत असल्याने आपले नेते राष्ट्रीय स्तरावरचे आहेत, असे उत्तर दिले. यातून त्यांनी आपला राष्ट्रीय नेतृत्वाचा स्तर अधोरेखित केला. तर देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व हे राज्य स्तरावरील असल्याचे सूचित केले.
त्यामुळे नारायण राणे यांच्यासारखे माजी मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते हे आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना देतात. पण त्यांच्या तुलनेत ज्युनिअर असलेल्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीसांचे नाव देखील राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांमध्ये घेत नाहीत, याची महाराष्ट्राच्या राजकारणात खमंग चर्चा सुरू झाली आहे.