विशेष प्रतिनिधी
मुंबई : लॉकडाऊन, महापालिकेचे प्रयत्न आणि नागरिकांच्या प्रतिसादामुळे मुंबईत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे; मात्र मृत्यूची संख्या अद्याप नियंत्रणात न आल्याने आरोग्य यंत्रणेपुढे चिंता कायम आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मृत्युदरात एक टक्क्यांनी वाढ झाली, तर सरासरीच्या दुप्पट मृत्युदर या आठवड्यात नोंदवण्यात आला. Death rate in Mumbai is very high
सपूर्ण कोरोनाकाळात मुंबईतील मृत्युदर २.०९ टक्के असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जाहीर करण्यात आली. अत्यवस्थ रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहेत. तसेच कोरोनाबरोबरच सहव्याधी विशेषतः श्व सनविकार असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.
रुग्णांवर वेळीच उपचार सुरू झाल्यास मृत्यू टाळता येतो. त्यासाठी नागरिकांनी लक्षणे असल्यास आजार अंगावर न काढता तत्काळ चाचणी करून घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, १६ मे ते २२ मे या काळात ९ हजार २२७ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर ३७४ जणांचा मृत्यू झाला. या काळात मृत्युदर हा ४.०५ टक्क्यांवर गेला असून गेल्या आठवड्यात तो ३.४४ टक्क्यांवर होता.