नाशिक : विजय वडेट्टीवार यांनी वाचला महायुतीतल्या संघर्षाचा पाढा, पण त्यांच्या काँग्रेसला अजूनही पराभवातून सावरून मर्मावर घाव का घालता येईना??, असा सवाल वडेट्टीवार यांच्याच वक्तव्यामुळे समोर आला आहे.
महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांच्या वाटपाचा वाद महायुतीमध्ये उफाळला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन दरे गावाला निघून गेले. त्यांना चुचकारायला चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे मंत्री दरे गावाला जाणार असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीला चिमटे काढले. भाजपने एकनाथ शिंदे यांचा वापर केला. आता शिवसेनेतून “नवा उदय” होईल. आधी उद्वजींना बाजूला सारुन एकनाथजींना आणले आता एकनाथजींना बाजूला सारून भाजपवाले शिवसेनेत नवा “उदय” घडवतील, असा टोमणा वडेट्टीवार यांनी हाणला. त्यांचा अंगुली निर्देश उदय सामंत यांच्याकडे होता.
वडेट्टीवार यांचे बाकीचे सगळे वक्तव्य पूर्ण राजकीय होते, पण त्यापेक्षाही त्यांनी उदय सामंत यांच्याकडे केलेला अंगुलीनिर्देश महत्त्वाचा होता आणि त्यात राजकीय तथ्य होते. महायुतीत सगळे आलबेल नाही. हे ठळकपणे सूचित करणारे होते. महायुतीला सध्या “प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी”ने सतावले आहे. खूप मोठे बहुमत मिळाले, तरी महायुतीला सरकार नीट चालवता येत नाही. भाजपला अपेक्षेनुसार प्रशासन आणि सरकारवर पूर्णपणे पकड बसवता आलेली नाही. एकनाथ शिंदे यांना पूर्ण क्षमतेने अजून कार्यरत करता आलेले नाही. उलट त्यांची नाराजी वाढत चालली आहे. ती दूर करण्यात असून भाजप अपेक्षेनुसार यशस्वी ठरलेला नाही. वडेट्टीवार यांच्या टोचणाऱ्या वक्तव्यातून हेच सत्य समोर आले.
काँग्रेस सावरली नाही
पण म्हणून वडेट्टीवार यांचे सगळे वक्तव्य तसेच या तसेच्या तसे खरे मानायचेही कारण नाही. कारण ती वस्तुस्थिती नाही. शिवाय वडेट्टीवार ज्या काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात, त्या काँग्रेसमध्ये तर महायुतीपेक्षा जास्त बचबचपुरी माजली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवातून काँग्रेसला सावरताच आलेले नाही. प्रदेशाध्यक्षपदाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. नाना पटोले दरम्यानच्या काळात दोन दिल्ली वाऱ्या करून आले, पण दिल्लीने त्यांना “अभय” दिल्याच्या बातम्या आलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आले असताना महाविकास आघाडी पूर्णपणे विस्कळीत आहे. त्यावर काँग्रेसला काही तोडगा काढता आलेला नाही. एकीकडे महायुतीतल्या विसंगतीवर आणि राजकीय संघर्षावर अचूकपणे बोट ठेवताना वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्याला काँग्रेस सावरता आलेली नाही, ही वस्तुस्थिती इतर सगळ्यांना उघडपणे दिसली असूनही ती वडेट्टीवारांना मात्र अजून दिसलेली नाही.
वास्तविक काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाने पराभवातून लवकर जाऊन महायुतीच्या प्रचंड बहुमताच्या सरकारला अचूकपणे घेरण्याचे अनेक विषय समोर दिसत आहेत. संतोष देशमुख + वाल्मिक कराड + धनंजय मुंडे प्रकरणात अजितदादांच्या राष्ट्रवादीला कॉर्नर करता येणे सहज शक्य आहे. पण काँग्रेसच्या नेत्यांना ते देखील नीट करता आलेले नाही. वरवर केलेल्या वारांनी महायुतीचे सरकार घायाळ होणार नाही. त्यासाठी मर्मावर घाव घालावा लागेल. पण हे काँग्रेस नेत्यांना अजून उमजलेले नाही.