रस्ते विकास कामांचा घेतला आढावा, रस्त्यांच्या विविध कामांना गती देण्याचे निर्देश
विशेष प्रतिनिधी
नागपूर : पुरामुळे क्षतीग्रस्त झालेल्या गावांतील रस्ते दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेऊन तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवा. या कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करू असे सांगत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ,राष्ट्रीय महामार्ग आणि विविध योजनांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या व नियोजित रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.Complete road works in flood damaged Gadchiroli district on priority Devendra Fadnavis
येथील देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा आज आढावा घेतला त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मिना यांनी यावेळी जिल्ह्यातील रस्त्यांच्या काम विषयी सादरीकरण केले. पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही भागातील रस्ते क्षतिग्रस्त झाले आहेत. या रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवा. या कामांसाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल व या गावांमध्ये दळणवळणाच्या सेवा पूर्ववत होतील यादृष्टीने कामे करण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या.
जिल्ह्यामध्ये ‘मिनरल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर’ अंतर्गत येणाऱ्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली. या कामांसाठी आवश्यक जमीन अधिग्रहनाची कामे पूर्ण करून कामांना गती देण्याचे निर्देश श्री फडणवीस यांनी यावेळी दिले. या प्रकल्पांतर्गत नवेगाव मोरे ,हैदरी, आलापल्ली बायपास, वडाळा पेठ, येलची आदी रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत.
राष्ट्रीय महामार्गाची जिल्ह्यातील एकूण ५५२ किमी ची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये आलापल्ली -भामरागड- लाहेरी आदी संवेदनशील भागातील रस्त्यांनी जवळपास ११२ कि.मी.च्या रस्त्यांची कामे तीन टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी श्री. फडणवीस यांनी दिल्या. या कामांना आवश्यक मंजुरी घेण्यासाठी राज्य शासनाच्या वर्ष २०१७ मध्ये निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाचा आधार घेण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय पुढील टप्प्यात राष्ट्रीय महामार्गाची ११७ कि.मी. च्या ५ कामांची माहितीही यावेळी देण्यात आली.
बिरसा मुंडा योजनेतून जिल्ह्यातील वाड्या, पाडे मुख्य गावांना जोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या २१३ कि.मी. रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव दुरुस्त करून शासनाच्या परवानगीसाठी पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत जिल्ह्यात एकूण ८६०.४८ कि.मी. पैकी ५९८ कि.मी. रस्त्यांची कामे झाली आहेत. या टप्प्यातील उर्वरित कामे तसेच टप्पा -२ अंतर्गत प्रस्तावित १६६ कि.मी. रस्त्यांच्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्ह्यातील रस्त्यांच्या ज्या कामांना केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी घ्यावयाची आहे अशा कामांचा आपण स्वतः पाठपुरावा करून हे विषय मार्गी लावू असेही फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले.
Complete road works in flood damaged Gadchiroli district on priority Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- ‘लॅंड फॉर जॉब’ प्रकरणात ईडीकडून लालूंची 10 तास चौकशी; 50 हून अधिक प्रश्नांची सरबत्ती
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याचा मोदी सरकारचा युनेस्कोला प्रस्ताव!!
- ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षाची सुप्रीम कोर्टात महत्त्वाची याचिका; सील केलेल्या जागेचे सर्वेक्षण करण्याची मागणी
- ED कडून बीएमडब्लू कार जप्त; अटकेच्या भीतीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता; पत्नीला मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली!!